आदिनाथ कारखान्यावर नव्या प्रशासक मंडळाची नियुक्ती ; घुमरे यांच्यासह पुंडे व देशमुखांचा समावेश
करमाळा समाचार – विशाल घोलप
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासक मंडळातील सदस्यांची मुदत संपल्यानंतर आता नव्या तीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, डाॅ.वसंत पुंडे, ॲड.दिपक देशमुख यांची नवीन प्रशासकीय मंडळात नियुक्ती आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर असताना संचालक मंडळांनी निवडणुकीचा खर्च जमा न केल्याने कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आले होते. यावेळी सुरुवातीला प्रशासक अधिकारी म्हणून बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे व संजय गुटाळ यांची प्रशासकीय मंडळात नेमणूक केली होती. आता त्यांचा कार्यकाल संपला आहे. त्यांच्या जागी नव्यानिवडी करण्यात आल्या.
सदरच्या निवडी करीत असताना यामध्ये नुकतेच भाजपात प्रवेश केलेले विलासराव घुमरे, कारखान्याच्या कामकाजाचा अनुभव असलेले डॉ. वसंत पुंडे व कायदेशीर सल्लागार ॲड दीपक देशमुख यांची नियुक्ती केली आहे. मागील कार्यकालात बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुरू करण्यात आला होता. परंतु शेतकऱ्यांनी कारखान्याकडे पाठ फिरवल्याने गाळप होऊ शकले नव्हते. तर आता लगेचच निवडणुका होणे शक्य नसल्याने नव्या प्रशासक मंडळाकडून कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी कोणती पावले उचलली जातील याकडे लक्ष लागून राहिले आहे.