करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

लोकार्पणापुर्वीच रस्त्यावर पाच मोठे अपघात ; ९ ठार वीस पेक्षा जास्त जखमी

करमाळा समाचार

संग्रहीत चित्र

करमाळा तालुक्यातील कोर्टी ते आवटी रस्ता नव्याने करण्यात आला आहे. पूर्वीपेक्षा याची रुंदी ही वाढलेली आहे. त्याशिवाय सदर रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांचा वेग वाढलेला दिसून येत आहे. त्याचे आता नुकसान होताना दिसत आहे. मागील महिनाभराच्या कालावधीत या रस्त्यावर ९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये प्रत्येक अपघातात चालकाची चुकी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चालकांनो स्वतःवर नियंत्रण ठेवा विशेष करुन पिकअप चालक.

एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या विकास निधीतून सदरचा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. करमाळा शहरापासून दोन विभागात रस्ता विभागला गेला आहे. करमाळा ते कोर्टी २१ किमी व करमाळा ते आवाटी २८ किमी असे दोन वेगळे विभाग या रस्त्यामध्ये येतात. मागील एक महिन्यापासून सदरच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असताना सदरच्या रस्त्यावर वेगवेगळे मोठे पाच अपघात झालेले दिसून आले आहेत. यामध्ये जवळपास ९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

सदरचा रस्ता पुणे व नगर जिल्ह्याला जोडणारा आहे. पण यापूर्वी बरेच दिवस हा रस्ता खराब अवस्थेत असल्याने त्या रस्त्यावरील वाहतूक कमी व वेगही कमी झाला होता. तर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर एकतर्फी रस्ता असल्याने प्रवासी वाहतूक थोड्या प्रमाणात होत होती. तर आत रस्त्याचे काम पूर्ण झाले असून पूर्वीपेक्षा दुप्पट रुंदी वाढलेली असली तरी चालकांच्या आततायीपणामुळे रस्ता मात्र धोकादायक झालेला दिसून येत आहे. वेगवान झालेला रस्ता व चालकाचा निष्काळजीपणा यामुळे हा धोका वाढला आहे. सदर रस्त्यावरून जात असताना चालकाने नियंत्रित वाहन चालवणे गरजेचे असल्याचे यातून दिसून येत आहे.

महिनाभरात ९ ठार ..
२६ नोव्हेंबर रोजी करमाळा आवटी रस्त्यावर सालसे येथे मोटरसायकल व ट्रकचा अपघात झाला होता, त्यामध्ये एक मयत झाले होते, ट्रकला पाठीमागून मोटरसायकलने धडक दिली होती, त्यामध्ये नवनाथ वाघमारे ता. हवेली जिल्हा पुणे यांचे निधन झाल होत. त्याच्याच दुसऱ्या दिवशी २७ नोव्हेंबर रोजी सालसे येथे मोटरसायकलला भरधाव वेगात आलेल्या पिकअप ने पाठीमागून धडक दिल्याने करमाळ्यातील गुरव दांपत्य ठार झाले होते. १० डिसेंबर रोजी कोर्टी येथे महिंद्रा गाडीच्या चालकाने चालत जाणाऱ्या प्रदीप शिंदे रा. करमाळा यांना धडक दिल्याने ते जागीच ठार झाले होते. तर २७ डिसेंबर रोजी सालसे येथे झालेल्या अपघातात कर्नाटक येथील चार भाविक ठार तर सहा जखमी झाले होते. तर त्याच दिवशी याच रस्त्यावर रात्रीच्या वेळी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर व पिकअप यामध्ये झालेल्या अपघातात एक ठार १५ जखमी झाले होते.

पिकअप व उस वाहतुक अधिक ..
राशीन – परांडा परिसरात जनावरांचा बाजार असतो, त्याशिवाय परांडा या भागातून जनावरांची मागणी पाहता या रस्त्यावरून जनावरांनी भरलेले पिकअप वाहतूक होत असते. सदरचे चालक रस्त्याची परिस्थिती न पाहता वेगात गाड्या चालवताना दिसतात. त्यांच्यामुळे ही अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होतोय अशा पिकअप चालकांवर योग्य वेळी नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्याशिवाय याच रस्त्यावरून तालुक्यातील व बाहेरील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केला जातो. यामुळे या रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरांचेही वाहतूक होते. त्याचाही इतरांना त्रास होत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE