प्लॅन, पैसा आणि करोडोंची फसवणुक ; संशयीताला शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान
करमाळा समाचार
सध्या शहरी भागाप्रमाणे आता ग्रामीणमध्ये ही शेअर मार्केटचे फॅड आले आहे. तालुक्यातील सुशिक्षित तरुण बाहेरगावी जाऊन आपला व्यवसाय नोकरी बघून शेअर मार्केटमध्ये ही गुंतवणूक करताना दिसतात. यामध्ये कोणाला यश येते तर कोणाला अपयश. असे करत असताना ते आपल्या सोबत इतरांनाही जोडण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या माध्यमातून स्वतःची कमाई करून इतरांना थोडासा लाभ देण्याचा प्रयत्न त्यातून केला जातो. पण यातून आता फसवणुकीचे प्रकारही होत आहेत.
करमाळा तालुक्यातील घोटी येथील रेवन्नाथ ननवरे हा तरुण असाच पुणे येथे कामास गेला होता. कोरोना काळात तो गावी आला व या ठिकाणच्या लोकांना प्रलोभने दाखवली व शेअर मार्केट मधून कशा पद्धतीने कमाई होते हे सांगितले. त्यानंतर गावासह इतर गावातही शेतकरी व युवक वर्गाकडून रक्कम घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याची सुरुवात केली. यापूर्वी अशी प्रकरण बार्शी व इतर ठिकाणी घडलेली आपण पाहिलेली आहेत. तसेच त्याने या ठिकाणीही संपूर्ण प्लॅन आखला व लोकांकडून पैसे गोळा करून सुरुवातीला त्यांना मोबदलाही दिला.
अशा पद्धतीने त्याने लोकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ झाली. त्यांनी सुरुवातीला पैसे गुंतवले व त्यातुन पैसे येत असल्याचे पाहून त्यात वाढीव गुंतवणूक केली. शिवाय आपले सगेसोयरे व मित्रमंडळींचेही पैसे गुंतवण्यास सांगितले. यातून मोठ्या प्रमाणावर रक्कम झाली. आतापर्यंत दाखल गुन्ह्यात केवळ तीन कोटी पर्यंतची रक्कम दिसून येते. परंतु ही रक्कम 25 ते 30 कोटी पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत त्याने सर्व रक्कम जमा केली व अचानक मोबदला देणे बंद केले.
त्यानंतर लोकांनी जेव्हा तगाला लावला त्यावेळी त्यांनी आपल्याच आत्महत्येचा बनाव रचला. पुण्याहून करमाळाच्या दिशेने येत असताना उजनी धरणाच्या पुलावरती आपली गाडी लावली व एक चिठ्ठी लिहिली की “मी आत्महत्या करत आहे” व तो तेथून निघून गेला. यानंतर स्थानिक पोलीस व नातेवाईकांनी उजनी धरण परिसरात शोध घेतला असता आज तागायत तिथे काहीही मिळून आला नाही. यावरून त्याने त्या ठिकाणाहून बनाव करून पळून गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर करमाळा तालुक्यातील शेतकरी व इतर लोकांनी करमाळा पोलीस ठाणे गाठले व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
नऊ ऑगस्ट रोजी सदरची गाडी लावून तो पळून गेला त्यानंतर गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल बारा दिवस उलटले. आतापर्यंत तो कुठपर्यंत जाऊन पोहोचला असेल याची खबर कोणालाच लागू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढ्या दिवसात त्याने लांबचा पल्ला गाठला असू शकतो आपली ओळख ही त्याने लपवली असेल. आता त्याला शोधण्याची पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोणतेही पुरावा नसताना त्याचा शोध घेणे कठीण जाऊ शकते.