राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी हनुमंत मांढरे-पाटील यांची नियुक्ती
प्रतिनिधी- दिलीप दंगाणे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हा संघटनेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हनुमंत मांढरे-पाटील यांची सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मांढरे-पाटील यांनी यापूर्वी करमाळा तालुकाध्यक्ष म्हणून पक्ष संघटना वाढीसाठी एकनिष्ठेने काम केले आहे. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून अनेकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर पक्षाचा निर्णय मान्य करून त्यांनी प्रचारात सक्रिय भूमिका बजावली होती.

सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
हनुमंत मांढरे-पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

