तरटगाव मारहाण प्रकरणातील चारही आरोपी निर्दोष मुक्त ; करमाळा कोर्टाचा निकाल
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील तरटगाव येथे फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या भावकीतील भांडणाच्या प्रकरणात चारही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा आदेश करमाळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमित किशोर शर्मा यांच्या न्यायालयाने दिला. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. आकाश मंगवडे यांनी कामकाज पाहिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी 2021 मध्ये तरटगाव येथे एका लहान मुलाचा टायर खेळताना दुसऱ्या कुटुंबाच्या घराकडे गेल्याच्या किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात तरटगाव येथील लेंडवे कुटुंबातील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 323, 504, 506 सह 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर एकूण 6 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.

सरकारी पक्ष व बचाव पक्षाचा युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब आणि अभिलेखावरील कागदपत्रांचा सखोल विचार केल्यानंतर आरोपींविरुद्धचा गुन्हा संशयातीतरीत्या सिद्ध झाला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे न्यायालयाने चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. आकाश मंगवडे यांनी प्रभावी युक्तिवाद करून कामकाज पाहिले.

