कुकडीच्या पाणी वाटपात दुजाभाव ,सावडीच्या शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा
करमाळा समाचार -संजय साखरे
कुकडीच्या पाणी वाटपात दुजाभाव होत असून कोर्टी वितरिकेस पाणी अतिशय कमी प्रमाणात येत आहे. सध्या भीषण दुष्काळाचे संकट असून कोर्टी वितिरिकेस पाणी कमी प्रमाणात दिलेले आहे. त्यामुळे जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे कुकडी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोर्टी वितरीकेस पूर्ण दाबाने पाणी सोडावे, अन्यथा उद्या सोमवार दिनांक 28 रोजी आम्ही सर्व शेतकरी आत्मदहन करणार आहोत असे निवेदन सावडीच्या शेतकऱ्यांनी कार्यकारी उपअभियंता, कुकडी विभाग ,कोळवडी ता. कर्जत जि. नगर यांना दिले आहे.

या निवेदनात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, कुकडीच्या पाणी वाटपात टेल टू हेड असा नियम असताना देखील आम्हा सर्व शेतकऱ्यांना जाणून-बुजून पाणी दिले जात नाही. हे पाणी आमच्या हक्काचे असून आमच्यावर जाणून-बुजून अन्याय केला जात आहे. गेल्या दोन महिन्यापासून पाऊस अजिबात न पडल्याने जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कुकडीच्या अधिकाऱ्यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन कोर्टी वितिरिकेस पूर्ण दाबाने पाणी सोडावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे .

या निवेदनावर अभिमन्यू देशमुख, संभाजी शिंदे, हनुमंत देशमुख, महादेव एकाड, अभिमान एकाड, धनाजी एकाड, नवनाथ थेंबे, भाऊसाहेब थेंबे, अशोक जाधव, नवनाथ जाधव, विनोद जाधव, अक्षय एकाड, एकनाथ मांढरे, छगन भोसले, महादेव भोसले, उद्धव भोसले, बयाजी थेंबे, नारायण थेंबे, तानाजी थेंबे, सुरेश शिंदे ,सोमनाथ देशमुख या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. सदर निवेदनाच्या प्रति त्यांनी अधीक्षक अभियंता, कुकडी विभाग सिंचन भवन पुणे, तहसीलदार कर्जत, तहसीलदार करमाळा यांना पाठविल्या आहेत.