करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विकृत चाळे करणाऱ्या करमाळा तालुक्यातील नराधमाला साताऱ्यात अटक

करमाळा समाचार :

अल्पवयीन मुलीची छेड काढण्यासह सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या संशयिताला सातारा शहर पोलिसांनी तब्बल ६० सीसीटीव्ही फुटेज तपासून तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अटक केली. आणखी महिलांची छेडछाड किंवा गंभीर प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी त्याचा शोध घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला.

विनोद मोहन कामटे (वय ४०, रा. सैदापूर, ता. सातारा, मूळ रा. जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सातारा शहरातील एका खासगी क्लासच्या पार्किंगमध्ये १४ वर्षीय मुलगी उभी असताना संशयिताने तिला जवळ बोलावून तिच्यासमोर अश्लील वर्तन केले. या घटनेनंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला संशयिताचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

तपासादरम्यान संशयिताने या घटनेनंतरही शहरातील दोन ते तीन वेगवेगळ्या ठिकाणी महिला व मुलींसमोर अश्लील वर्तन केल्याचे आणि छेडछाड केल्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे पोलिसांनी तपास अधिक गतिमान केला. संशयिताची ओळख पटवण्यासाठी त्याचे छायाचित्रही प्रसारित करण्यात आले. तब्बल ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी संशयिताचा माग काढला आणि अखेर त्याला ताब्यात घेतले.

वडापावच्या गाडीवर करत होता काम
पोलिसांच्या माहितीनुसार, विनोद कामटे हा सातारा शहरातील एका वडापावच्या गाडीवर काम करत होता. यापूर्वी त्याने काही काळ वाहनचालक म्हणूनही काम केले होते. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याचे आई-वडील सुमारे वीस वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यातून साताऱ्यात स्थायिक झाल्याची माहिती समोर आली आहे.

महिला व अल्पवयीन मुलींशी संबंधित आणखी काही घटना त्याच्याकडून घडल्या आहेत का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या प्रकरणामुळे सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा विकृत प्रवृत्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE