बस मधून पडून विद्यार्थी जखमी ; व्हायराल व्हिडीओ नंतर ग्रामस्थांचा खासदार ओमराजेंना फोन
करमाळा समाचार

एसटी महामंडळ आणि प्रवासी यांच्यातील ताळमेळ अद्यापही बसताना दिसून येत नाही. बऱ्याच वेळा बस रस्त्यात बंद पडण्याची प्रकार तर आपण पाहिलेलेच आहे. पण प्रवाशांसोबत उद्धट वागणे व निष्काळजीपणाने प्रवास करणे यासाठी आता बस वाहक व चालक चर्चेत येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी बस मध्ये मुलांना बसवण्यावरून वाहका सोबत शिक्षक व विद्यार्थ्यांचा वाद झाला होता. तर आता विद्यार्थी दरवाज्यात उभा असतानाच बस पुढे नेल्यामुळे मोठा अपघात घडला असता परंतु सुदैवाने मुलगा बस मधून पडूनही सुरक्षित आहे.

करमाळा तालुक्यातील वीट येथील शाळेमध्ये विद्यार्थी येण्यासाठी बस थांब्यावर थांबलेले असताना विहाळ गावी पुण्याहून परंडाच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसने थांब्यापासून काही अंतरावर गाडी थांबवल्याने मुला-मुलींसह वृद्ध लोकांना त्या ठिकाणी धावत जाऊन गाडी पकडावी लागली अशा वेळी गाडीत जागा नसतानाही वेळेवर जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड दिसून आली. याशिवाय दुसरी गाडी लवकर येणार नसल्याने किंवा त्या गाड्यांची शाश्वती नसल्याने विद्यार्थ्यांनी त्याच गाडीने जाण्याचा पर्याय निवडला.
संबंधित गाडीमध्ये बसल्यानंतर दरवाज्यातच काही मुले असताना बस पुढे सुरू झाली. यावेळी बस चालक व वाहक यांनी सर्व प्रवासी सुरक्षित आत बसलेले आहेत का, विद्यार्थी पोहोचले आहेत का? तसेच दरवाजा लावून घेण्याची काळजी घेणे गरजेचे होते. परंतु तसे न करता बस चालकाने बस सुरू केली व दरवाज्यामध्ये उभा असलेला विद्यार्थी बसच्या बाहेर फेकला गेला. यावेळी सुदैवाने गाडी सुरुवातीच्या काळात असल्याने वेग अधिक नव्हता. त्यामुळे दुर्घटना घडली नाही. परंतु काही अंतरावर जाऊन हा मुलगा बाहेर फेकला गेला असता तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे बस वाहक व चालक यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

वाहक व चालकांना प्रवासादरम्यान सुरक्षित प्रवास करीत वेळेवर पोहोचण्याची घाई असते. शिवाय गाडीत जागा नसताना प्रवासी ही बसण्याचा हट्ट धरतात. दोघांनी समन्वय साधून अपघात कसा घडला नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रवाशांनी ही वाहक व चालक यांना सहकार्य करण्याची गरज आहे. संबंधित प्रकाराबाबत विहाळ येथील ग्रामपंचायत ने थेट धाराशिव चे खासदार ओम राजे निंबाळकर यांना संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला व कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रवाशांनीही सबुरीने घेण्याची वेळ…
एसटी चालक वाहक दिवसभर विविध ठिकाणी प्रवास करून आलेल्या असतात त्यांच्यावरही सुरक्षित प्रवास करण्याचा ताण असतो शिवाय वरिष्ठांचे आदेश पाळण्याचा तणाव व संपूर्ण जबाबदारी उचलत तर प्रवास सुरू असतो. अशावेळी प्रवाशांनी वाहक व चालक यांच्याशी थेट वाद-विवाद होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा विनाकारण प्रवासीही वाहक व चालक यांच्याशी वाद घालत असता. जिथे थांबा नसेल तिथे थांबण्यासाठी आग्रह जातात. तसेच इतर कारणांनी वरूनही वाद होताना दिसतात ते प्रवाशांनी टाळता आले तर बरेचसे प्रश्न सुटतील.
आगाराने वाढीव बस देण्याची गरज…
तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी एका गावाहून दुसऱ्या गावामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असतात अशा ठिकाणी अचानक गाडी आल्यानंतर भरलेल्या गाडीत विद्यार्थी बळच ठासून भरले जातात. त्यामुळे वाद विवाद होत अडचणीतून विद्यार्थ्यांनाही प्रवास करावा लागतो. त्यातून असे अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे करमाळा आगाराने संबंधित शाळांसाठी विशेष गाड्यांची सोय करणे गरजेचे आहे.


