निर्लज्जम सदा सुखी – ‘आओ जाओ घर तुम्हारा’ झालेला करमाळा ; जबाबदार कोण? जनता का नेतेमंडळी
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात बरेचशे गाव आज पाणी अभावी तहानलेली आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच करमाळ्याचे टॅंकर सुरू केले जातात. एकीकडे उजनी तर दुसरीकडे सीना नदी याशिवाय शहरानजीक मांगी तलाव असतानाही तालुक्यातील गावांना पाण्यासाठी तळमळावे लागते. विशेष म्हणजे मांगी पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेले एमआयडीसी केवळ पाण्याअभावी सुरू होऊ शकली नाही ही शोकांतिका आहे. एवढं सर्व असताना तालुक्यातील पाणी बाहेर जात आहे ही किती लाजिरवाणी बाब व विरोधाभास आहे हे समजू शकत नाही.

करमाळा तालुक्यातील जनता इतकी बिनधास्त सोशिक व परावलंबी आहे ही इथे काय चालले आहे त्याचं त्यांना देणं घेणं नाही. ज्यावेळी वेळ स्वतःवर येईल त्यावेळी यांचे डोळे उघडतील. इतर तालुक्यातील नेते मंडळी आपल्या तालुक्यात विकासासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दर्शवतात, वाटेल त्याला विरोध करण्याची त्यांची तयारी असल्याने त्या भागाचा विकास करण्यासाठी ते काहीही करू शकतात. पण त्या उलट आपल्या तालुक्यातील कर्तव्यदक्ष नेते मंडळी मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसून येतात. नवीन काही आणणे तर दूरच, तालुक्यात आहे त्याचा तरी वापर नीटनेटका करा अशी अपेक्षा आहे.
करमाळा तालुका म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती झाली आहे. तालुक्यातील परिस्थिती सुधारण्यापेक्षा अधिकच बिकट कशी होईल याकडे अनेकांचे लक्ष असते. एकमेकांचे पाय खेचण्याच्या राजकारणाशिवाय इथे काहीच होत नाही. त्यामुळे विकास करण्याचा विचार येऊ लागला दुसरे त्यात अडथळा निर्माण करतो. विकास तर दूरच उलट हे चुकीचे कसे होईल याला हातभार लावण्याचे काम इतर मंडळी करताना दिसून येतात.

आज आपल्या तालुक्यात प्यायला पाणी नाही, टँकर सुरु असतात, जमिनी ओस पडत चालल्या आहेत. येथील लोकांना पाणी नजीक असताना आपण देऊ शकत नाही याची लाज का वाटत नाही? त्यात आपले पाणी बाहेर जात असताना निर्लज्जासारखे बघण्यात काय अर्थ आहे. एका पाठ एकाची सत्ता येऊन गेली पण एकालाही एमआयडीसी मध्ये साधे पाणी आणता आले नाही. इतर तालुक्यातील मंडळी 20 किलोमीटर पासून ते 250 किलोमीटर पर्यंत आपल्या तालुक्यासाठी पाणी खेचून नेतात. पण आपल्याला दीड दोन किमी नेता येईना. कशाला करता राजकारण आणि मोठमोठ्या गप्पा? सोडून द्या सगळं तालुक्याला विकासासाठी चांगल्या लोकांची गरज आहे तर दृष्टिकोन असलेल्या नेत्याची आवश्यकता आहे.

