E-Paper

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव दुसऱ्यांदा रद्द ; तरीही आ. पडळकर चोंडीत येणार

सोमवारी चोंडीत आ.गोपीचंद पडळकर करणार ” धनगर आरक्षणाचा जागर ”

श्रीक्षेत्र चोंडी (कर्जत) –

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी येथे दरवर्षी साजरा होणारा जयंती महोत्सव रद्द करण्यात आला आहे. गेल्या २६ वर्षापासून सूरू झालेल्या जयंती महोत्सवाची परंपरा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  दुस-यावर्षीही खंडीत झाली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव  म्हणून चोंडी हे गाव  राज्यात भाजपा – शिवसेना युती सरकार असताना सन १९९५ मध्ये प्रथमच प्रकाशझोतात आले. २५ आॅगस्ट १९९५ रोजी अहिल्यादेवींच्या २०० व्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंढे  यांनी चोंडीत उपस्थित राहतानाच चोंडी येथे विविध विकासकामांना दोन कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली. त्यावर्षापासून अहिल्यादेवी होळकरांची पुण्यतिथी साजरी करण्यास प्रारंभ झाला . त्यावेळी तत्कालिन मंत्री अण्णा डांगे यांनी याकामी पुढाकार घेत चोंडीचा कायापालक करण्याचे काम केले.

दरम्यान त्यावेळच्या यशवंतसेनेचे सरसेनापती व नंतरच्या काळात राष्ट्रीय समाज पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, माजीमंत्री आ महादेव जानकर यांनी ३१ मे १९९६ रोजी अहिल्यादेवी होळकरांची पहिली जयंती चोंडीत साजरी  केली. जानकर यांनी अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करण्याचा पायंडा सूरू केला. तो आजही चालूच असून , जयंतीचे स्वरूप वर्षानूवर्ष वाढत आहे.

महादेव जानकर यांनी सन १९९६ साली सूरू केलेला जयंती महोत्सव २०१५ सालापर्यंत २० वर्ष  साजरा केला. याच वीस वर्षात जानकर यांची राजकीय जडणघडण झाली. प्रारंभीच्या काळात धनगर समाजासह अन्य अठरापगड समाजातील तरूणांना यशवंतसेनेच्या माध्यमातून एकत्र करून आपल्या राजकीय वाटचालीला प्रारंभ केलेल्या जानकर यांनी सन २००३ साली चोंडी येथेच ३१ मे रोजी जयंतीदिनी आपल्या स्वताच्या राष्ट्रीय समाज  पक्षाची स्थापना केली.

यादरम्यान जानकर यांच्या याच  पक्षात अनेक उदयन्मुख कार्यकर्ते घडले. त्यामध्ये नूकतेच विधानपरिषदेवर निवड झालेले गोपीचंद पडळकर यांचाही समावेश आहे. दरम्यानच्या काळात सन २००७ पासून ३१ मे जयंतीनिमित्त चोंडीत येणा-या हजोरो भाविकांना भाजपाचे तत्कालिन जामखेड तालुकाध्यक्ष प्रा राम शिंदे यांनी महाप्रसाद व शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय सूरू केली ती आजही अखंडीत चालू आहे.
जानकर यांनी सन २०१२ मध्ये ३१ मे जयंतीदिनी राज्यातील ओबीसी नेते दिवंगत गोपीनाथ मुंढे आणि तत्कालिनमंत्री छगन भूजबळ यांना चोंडीला जयंती महोत्सवास निमंत्रित केले. त्यानंतर जानकर यांनी दिवंगत मुंढे यांना पुढे सन २०१३ व सन २०१४ मध्येही निमंत्रित केले. दरम्यान३१ मे २०१४ चा मुंढे यांचा चोंडीतील कार्यक्रम हा शेवटचाच ठरला. केंद्रात ग्रामविकास मंत्री म्हणून २६ मे २०१४ रोजी शपथविधी झाल्यानंतर मुंढे यांचा महाराष्ट्रातील चोंडीतील कार्यक्रम पहिला आणि शेवटचाच ठरला होता. यानंतर जानकर यांनी सन २०१५ मध्ये ३१ मे रोजी जयंती महोत्सव साजरा केला तो शेवटचाच. त्यानंतर जानकर यांनी जयंती महोत्सव चोंडी ऐवजी मुंबई येथे आझाद मैदानावर साजरा करण्यास प्रारंभ केला.

सन २०१६ पासून जयंती महोत्सवाची धूरा तत्कालिन मंत्री व चोंडीचे सूपुत्र अहिल्यादेवी होळकरांचे माहेरकडील  वंशज प्रा राम शिंदे यांनी सांभाळली आहे. गेली चार वर्षापासून प्रा शिंदे हे चोंडी येथे जयंती महोत्सव साजरा करत आहेत. यानिमित्त शिंदे यांनी तत्कालिन लोकसभा सभापती सुमित्रा महाजण , केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रय ,खा.छत्रपती संभाजीराजे, पंकजा मुंढे यांच्यासह अनेक मान्यवरांना चोंडीत निमंत्रित केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर चोंडीत कायम उत्साहाचे वातावरण असते. परंतु सलग दुस-या वर्षीचा जयंती महोत्सव रद्द झाल्याने लोकांमध्ये निराशा दिसून येत आहे.

 

       पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जन्मगाव श्रीक्षेत्र चोंडी येथे दरवर्षी ३१ मे रोजी होत असते. परंतु यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ३१ मे पर्यंत  शासनाने टाळेबंदी जाहीर केली असल्याने , यावर्षी श्रीक्षेत्र चोंडी येथे होणारा जयंती उत्सव रद्द करण्यात आला आहे. यावर्षी आपण आपल्या घरीच जयंती साजरी करावी. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
     
– प्रा.राम शिंदे
   माजी मंत्री

चोंडीतून धनगर आरक्षणासाठी जागर.
—————————————————

विधानपरिषदेचे सदस्य आ.गोपीचंद पडळकर चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या काही निवडक समर्थकांसोबत सोमवारी (दि.३१) येणार आहेत. धनगरांना आरक्षण  मिळेपर्यंत आदिवासीच्या सर्व योजना जशाच्या तशा लागू करण्याचा निर्णय मागील भाजपा सरकारने घेतला आणि  आरक्षण मिळे पर्यंत १ हजार  कोटीच्या योजना  तसेच कोर्टात धनगर आणि धनगड एकच असल्याचे प्रमाणपत्र दिले. परंतु महाविकास आघाडी सरकारने १ हजार कोटीच्या  पैकी, एक पैसा सुद्धा धनगर समाजाला अद्याप पर्यंत दिला नाही.म्हणून त्या योजना  निधी अभावी धूळ खात पडल्यात.याप्रश्री महाविकास आघाडी सरकारचे डोळे उघडण्या साठी आणि आरक्षणासहित ज्या आदिवासीच्या धर्तीवर १ हजार कोटीच्या योजना भाजप सरकारने लागू केल्या होत्या. त्या आरक्षण मिळे पर्यंत सुरू ठेवाव्यात, म्हणून ३१मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडी येथे आ.पडळकर  ‘ आरक्षणासाठी जागर ‘ करणार असून , तशी व्हिडीओ क्लिप स्वता आ. पडळकर यांनी  तयार करून चार दिवसापुर्वी व्हायरल केली आहे.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE