E-Paperकरमाळा

पहिला पुरस्कार नाकारला, अन् आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलो

समाजाभिमुख कामाची दखल घेऊन समाजातील विविध संघटना-संस्था पुरस्काररूपी कौतुकाची थाप देतात. मात्र, ही कौतुकाची थापच नको, कारण भाषण करता येत नाही. सत्कारानंतर भाषण करण्याची भीती सतावत होती, ती भीती पहिल्या पुरस्काराने घालवली. त्यानंतर मातृभाषेसह हिंदी आणि इंग्रजीत सर्मपक उत्तरे देत एक नव्हे, दोन नव्हे तब्बल हजारो पुरस्कार स्वीकारल्याचे मुलगी वाचवा अभियानचे जनक मेडिकेअर हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश राख यांनी सांगितले.


डॉ. राख म्हणाले की, ३ जानेवारी २०१२ मध्ये मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर बिल घ्यायचे नाही, या माध्यमातून मुलगी वाचवा अभियान सुरू केले, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. समाजातील सर्वस्तरातून कौतुक होऊ लागले. त्याची दखल घेत भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने दिलीप भाडळे यांनी डिसेंबर २०१२ रोजी पुरस्कार जाहीर केल्यानंतर मी स्पष्टपणे नकार दिला. मात्र, त्यांनी आग्रह केल्यानंतर पुरस्कार स्वीकारल्यानंतर भाषण करणार नाही, या अटीवर पुरस्कार स्वीकारण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला आणि माईक माझ्यासमोर धरल्यानंतर सर्वांगाला घामच फुटला, धन्यवाद, आभारी आहे, कार्यकर्त्यांची नावे घेऊन भाषणाची वेळ निभावून नेली. त्यातून बरेच काही शिकता आले. त्यानंतर आजपर्यंत गाव, शहर, जिल्हा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नव्हे हजारो पुरस्कार मिळाले. पुरस्कार ठेवण्यासाठी घर आणि हॉस्पिटलमध्येही जागा अपुरी पडू लागली आहे. स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये अस्खलीत मार्गदर्शन करण्याची उर्मी मला पहिल्या पुरस्कारातून मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मातृभूमी करमाळा (जि. सोलापूर) जन्मगावाचा पुरस्कार हृदयात साठवून ठेवला आहे. दरम्यान, सिनेस्टार अमिताभ बच्चन यांनी पुरस्कार तर दिलाच, त्याशिवाय सन्मानप्रसंगी सांगितले की, माझे जगात चाहते आहेत. मी मात्र, डॉ. गणेश राख यांचा चाहता आहे, हे ऐकल्यानंतर काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर जिल्हा, राज्य आणि देशभर मुलगी वाचवा अभियान रॅलीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्याचे मनोमन समाधान वाटत आहे. पहिल्या पुरस्कारावेळी दोन वाक्य बोलता येत नव्हती, त्यानंतर जगभरात अनेक कार्यक्रम, रॅलीच्या माध्यमातून मातृभाषेसह हिंदी-इंग्रजीतून मार्गदर्शन करण्यात यशस्वी ठरलो आहे. समाजामध्ये मान-सन्मानरूपी पुरस्कार कामाची व्याप्ती वाढवतो, हेही आतापर्यंतच्या पुरस्कारातून शिकलो, हे सांगताना मला अभिमान वाटत आहे.

दरम्यान, भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे दिलीप भाडळे म्हणाले की, समाजाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचे योगदान आहे, अशा कर्तृत्ववानांना पुरस्कार देऊन सन्मान करण्याची गरज आहे. त्यातून समाजाची उन्नतीच होते. त्याच भावनेतून डॉ. गणेश राख यांची पुरस्कारासाठी निवड केली होती. त्यांनी पहिल्यांदा पुरस्कार नाकारला. मात्र, त्यांनी भाषण न करण्याच्या अटीवर पुरस्कार स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. तरीसुद्धा आम्ही त्यांना दोन शब्द बोलण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांच्या मुलगी वाचवा कामाची व्याप्ती आणि आम्ही दिलेल्या पुरस्काराची उंची वाढली. हे सांगताना आम्हालाही अभिमान वाटत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE