आदिनाथचा लिलाव की करमाळ्याच्या स्वाभिमानाची विक्री? ; राजकीय महत्त्वाकांक्षेपायी आदिनाथचा बळी !!
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात सध्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण जोरात सुरू आहे. नेते आणि कार्यकर्ते एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत; मात्र तालुक्याची आर्थिक नाडी असलेल्या आणि शेकडो कुटुंबांचा आधार असलेल्या आदिनाथला वाचवण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. काही दिवसांतच कारखान्याचा लिलाव होण्याची शक्यता असून, त्यासोबत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि तालुक्याची अस्मिता धोक्यात आली आहे.

आज समाजमाध्यमांवर आणि राजकीय व्यासपीठांवर आरोप-प्रत्यारोप चवीने वाचले जात आहेत. मात्र या सगळ्या गदारोळामागे शेकडो कामगार, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक भविष्य अंधारात जात आहे, याची फारशी चर्चा होताना दिसत नाही. एकेकाळी या कारखान्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत होती. शेतकऱ्यांच्या ऊसाला बाजारपेठ मिळत होती, कामगारांच्या घरची चूल पेटत होती आणि स्थानिक व्यापारालाही चालना मिळत होती.
आज तोच कारखाना केवळ डबघाईला आलेला नाही, तर विक्रीच्या उंबरठ्यावर उभा आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारखान्याचा आणि त्याच्या जमिनीचा भविष्यात कसा वापर होईल, हे नवीन मालकाच्या इच्छेवर अवलंबून राहणार आहे. एकदा मालकी हक्क बदलल्यानंतर तालुक्याच्या हितापेक्षा खरेदीदाराचे व्यावसायिक हित महत्त्वाचे ठरणार, हे वास्तव नाकारता येणार नाही.

भाडेतत्त्वावर कारखाना देण्याच्या चर्चेलाही काहींनी विरोध केला होता. मात्र आज संपूर्ण कारखाना आणि त्याची जमीनच विक्रीच्या प्रक्रियेत असताना अनेक जण शांत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका संस्थेचा राहिलेला नाही, तर संपूर्ण तालुक्याच्या आर्थिक भवितव्याचा बनला आहे.
कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी अडचणीच्या काळात योग्य निर्णय घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्याचा पर्याय स्वीकारला असता, तर कदाचित आजची वेळ आली नसती, असे मत अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र कारखाना स्वतःच चालवण्याचा हट्ट, राजकीय महत्त्वाकांक्षा आणि जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची प्रवृत्ती यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
आज काही जण स्वतःची राजकीय रेषा मोठी करण्याच्या प्रयत्नात आहेत, तर काही जण कारखाना बुडाल्याचे खापर इतरांवर फोडत आहेत. पण या सगळ्या संघर्षात सर्वाधिक नुकसान करमाळा तालुक्याचे होत आहे. शेकडो कुटुंबांचे भविष्य, शेतकऱ्यांचा आधार आणि तालुक्याची आर्थिक ताकद धोक्यात आली आहे.
राजकारण करणारे अनेक आहेत; पण आदिनाथ वाचवण्यासाठी पुढे येणारे कोण? आणि झालेल्या या अपरिमित नुकसानीची भरपाई कोण करणार? हा प्रश्न आज प्रत्येक सजग नागरिकाच्या मनात आहे.

