सरकार मित्र मंडळाचा नगरपरिषद निवडणुकीत नवा विक्रम ; एकाच मंडळातील सात सदस्य विजयी
करमाळा – विशाल घोलप

युवक हा देशाचा पाया असून युवकांनी एखाद्या गोष्टीत पुढाकार घेतल्यास काय होऊ शकतं याचा प्रत्यय करमाळा नगरपरिषदेच्या माध्यमातून येऊन गेला आहे. नगर परिषदेमध्ये युवकांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले. ज्या बाजूला मोठ्या प्रमाणावर युवक त्या बाजूला विजय असं गणित या ठिकाणी दिसले. तर त्यातही एकाच मित्र मंडळातील तब्बल सात नगरसेवक निवडून येण्याचा बहुमान हा सरकार मित्रमंडळाने पटकावला आहे. विशेष म्हणजे 20 सदस्यांपैकी सात सदस्य हे केवळ सरकार मित्रमंडळाचे आहेत. याशिवाय विविध पदाधिकारी व व्यापारी व सरकारी कर्मचारी भरणा असलेले हे मंडळ सध्या या नगरसेवकांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

करमाळा नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर एकाच संघटनेत काम करणाऱ्या वेगवेगळ्या सदस्यांनी आपापल्या गटातटाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण सर्व मित्र एकाच वेळी लढत असताना कोणतेही मनात वैर न ठेवता किंवा आपण ज्या पक्षाकडून काम करत आहोत त्या पक्षाला अंधारात न ठेवता उघडपणे स्वतःच्या विजयासाठी जरी प्रयत्न केले जात असले तरी एकाच मंडळातील सात सदस्य निवडून येणे हा एक नवा विक्रम करमाळ्यातील मंडळाच्या नावावर नोंदवला गेला असे दिसून येत आहे.
करमाळ्यातील सरकार मित्रमंडळाची स्थापना 2006 मध्ये झाली होती. यामध्ये फक्त एका गल्ली किंवा एका शहरापुरते सदस्य मर्यादित नसून वेगवेगळ्या भागातून सदस्य या ठिकाणी सहभागी झालेले दिसून आले. शहरासह ग्रामीण भागातूनही अनेक सदस्य या ठिकाणी सहभाग नोंदवतात. त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवली जातात. महापुरुषांचे जयंती, पुण्यतिथी तसेच गणेशोत्सव व विविध सामाजिक उपक्रम या मंडळाच्या वतीने राबवले जातात. या मंडळातील जवळपास सात सदस्य किंवा त्यांच्या घरातील उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असताना लोकांनीही त्यांना पसंती दिली आहे.

त्यामध्ये उपनगराध्यक्षपदी नुकतेच निवड झालेले अतुल फंड, सचिन घोलप, सचिन गायकवाड यांच्या मातोश्री निर्मला गायकवाड, विजय घोलप यांच्या पत्नी लता घोलप, प्रशांत ढाळे, युवराज चिवटे व दादा इंदलकर यांच्या भावजय पुजा इंदलकर यांचा समावेश आहे. सदर निवडी होत असताना अतुल फंड, घोलप, गायकवाड हे भाजपामधून तर चिवटे व ढाळे हे शिवसेनेतुन (जगताप गटातून) निवडून आले. तसेच दादा इंदुलकर यांच्या भावजय पूजा या शहर विकास आघाडीतुन (सावंत गटातून) निवडणूक विजयी झाल्या आहेत. त्यामुळे सर्व उमेदवार एकाच मित्रमंडळातील असले तरी वेगवेगळ्या गटातून निवडून येत त्यांनी युवक काय करू शकतात हे दाखवून दिलं.
याशिवाय सदरच्या मंडळामध्ये जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे, बोरगावचे सरपंच विनय ननवरे, पोटेगावचे सरपंच बापू शिरगिरे, मकाईचे संचालक अमोल यादव, माजी नगरसेवक प्रवीण जाधव, अकोले खुर्द टेंभुर्णी येथील सरपंच कांतीलाल नवले, सकल मराठा समन्वयक विजय लावंड, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण जगताप, मराठा फोर्टचे राहुल पवार, अर्बन बँकेचे संचालक यशराज दोशी व एडवोकेट सुनील घोलप या प्रमुख मान्यवरांचाही यात भरणा असून याशिवाय व्यापारी व शासकीय नोकरदारही या मंडळात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंडळाचे कार्य तर उत्तम आहेच शिवाय संपर्क दांडगा असून येणाऱ्या काळात नागरिकांनाही त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.


