… तर जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राहिल – सकल मराठा समाजाचा इशारा
करमाळा समाचार -संजय साखरे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या न्यायी मागणीसाठी हडसणी ता. हादगाव जि. नांदेड येथील दत्ता पाटील हे मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे . त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून करमाळा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज माननीय तहसीलदार करमाळा यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मराठा समाजाला 50% च्या आतील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे , एस इ बी सी उमेदवारांना तात्काळ सेवेत घ्यावे , मराठा विद्यार्थी वसतिगृह काम तात्काळ सुरू करावे, मराठा आंदोलकावरील गुन्हे माफ करावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी मराठा समाजाचे नेते कैलासवासी विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा आरक्षण मिळावे यासाठी मुस्लिम मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा आमरण उपोषणास पाठिंबा असल्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे; नाही कुणाच्या बापाचे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले दत्ता पाटील यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्र शासन यांच्यावर असेल. दत्ता पाटील यांना न्याय मिळाला नाही तर मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांना महाराष्ट्रात फिरून देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी करमाळा शहर व तालुक्यातील मराठा सेवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.