करमाळासोलापूर जिल्हा

फिसरे ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी !

करमाळा समाचार 

पट्टणकोडोलीसह इंगळी, अलाटवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. या भागाची पाहणी करुन आपल्या परीने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी फिसरे (ता.करमाळा,जि. सोलापूर) येथील फिसरे ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ३०० पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप फिसरे गावचे , उपसरपंच संदीप नेटके, ग्रामपंचायत सदस्य विजय औताडे, मोहन नेटके, सुनिल नेटके आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी नागेश चव्हाण, सोनू तळेकर, सुनिल काटे, रमेश दौंडे , संदीप नवगिर, पप्पू मुल्लाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना उप सरपंच संदिप नेटके म्हणाले, अलाटवाडीसह परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व या लोकांना फुल ना फुलाची पाकळी मदत करण्यासाठी आम्ही एवढ्या दूरवर आलो. येथील परिस्थिती पाहून मन हेलावून गेले. या सर्वांना मदत करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी बहुमूल्य सहकार्य केल्यामुळे आम्ही इथेपर्यंत आपणाला मदत करण्यासाठी पोहोचलो असल्याचे त्यांनी सांगितले.


पट्टणकोडोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कृष्णाजी मसुरकर यांनी फिसरे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केलेली मदत लाखमोलाची आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी वंचितांना मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे सांगितले.
या कामी हुपरी येथील सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब जगताप यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी विकास जाधव, शैलेश दिगडे, रविंद्र पाटील, सचिन जाधव, रविंद्र कदम आदी स्वयंसेवकांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो :- अलाटवाडी……. येथे फिसरे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना , उपसरपंच संदीप नेटके, आबासाहेब जगताप व मान्यवर

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE