करमाळा कनेक्शनची चर्चा; भिगवण पोलिसांच्या जाळ्यात चोरट्यांची टोळी
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील मोटार व केबल चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असताना चोरट्यांचा शोध करमाळा पोलिसांना अद्याप लागलेला नाही ही बाब चर्चेत असताना पाच चोरट्यांना मुद्देमालासह भिगवण पोलिसांनी पकडल्याने भिगवण पोलिसांचे कौतुक होत आहे. संबंधित चोरट्यांमध्ये एक मूळचा करमाळा तालुक्यातील अटकेत असून त्याचे धागेदोरे केवळ दौंड व भिगवण पूरते दिसून येत आहेत. अधिक माहिती व तपास केल्यानंतर करमाळ्यात त्यांचे संबंध आहेत का हे उघड होणार आहे.

सदरच्या कारवाईत ६ लाख ३३ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिक्सळ परिसरात नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार भिगवण बायपास रोडवर संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.
यावेळी संशयास्पद चारचाकी वाहन ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यामधील चार जणांना अटक करण्यात आली. आरोपींकडून विविध ठिकाणांहून चोरी करण्यात आलेल्या केबलच्या गुंडाळ्या तसेच वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे १८२ मीटर केबल, चारचाकी वाहन तसेच इतर साहित्याचा समावेश असून त्याची एकूण किंमत ६ लाख ३३ हजार ६५० रुपये इतकी आहे. यावेळी एक मुळचा. करमाळा तालुक्यातील निलेश मोटे तर इतर चार परप्रांतीय अटकेत आहेत.



