करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

वायर व मोटार चोरीतील भामटे भिगवण पोलिसांच्या ताब्यात ; आरोपी मध्ये करमाळा येथील एकाचा समावेश

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात विविध ठिकाणी मोटार व वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. अखेर या चोरीप्रकरणातील काही संशयितांना भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एक आरोपी करमाळा तालुक्यातील असल्याचे समजते.

या चोरीप्रकरणांबाबत करमाळा तसेच दौंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, संबंधित आरोपींची माहिती दोन्ही पोलिस ठाण्यांना देण्यात आली आहे. पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सकाळपासून सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत होते. या फोटोंमध्ये वायर व इतर साहित्य जप्त केल्याचे दिसून येत होते. सुरुवातीला या फोटोंबाबत अनेकांकडून शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र अधिक माहिती घेतली असता हे फोटो खरे असून भिगवण पोलिसांनीच ही कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यातील आरोपींपैकी एक आरोपी करमाळा तालुक्यातील असून, करमाळा व दौंड परिसरातील दाखल गुन्ह्यांमध्ये पोलिसांना त्याचा शोध होता. आरोपी सापडल्यानंतर याबाबत करमाळा व दौंड पोलिसांना माहिती देण्यात आली असून, संबंधित पोलिस पथके भिगवण येथे रवाना झाल्याची माहिती आहे. आता या आरोपींना कोणते पोलीस ठाणे ताब्यात घेणार आणि पुढील तपास कोणत्या दिशेने होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE