एकाच्याचा दोन बायका समोरासमोर मैदानात ! ; उमेदवारीची महाराष्ट्र चर्चा पण खरा प्रकार आला समोर
करमाळा समाचार – भिवंडी
पतींच्या नावात साम्य असल्याने एकाच वार्डात नवऱ्याने आपल्या दोन बायकांना उभे केले, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळे या दोन्ही महिला उमेदवारांना आणि त्यांच्या वेगवेगळ्या नवऱ्यांना, घरातील सर्वांना खूप मानसिक त्रास होतोय.

निवडणुका म्हणजे प्रचार, साकडं, आरोप, प्रत्यारोप, आमिषं, आश्वासनं असं बरंच काही असतं. पण निवडणुका म्हणजे भलताच गोंधळही असतो हे जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातल्या निवडणुका पाहिल्यावर अगदी तंतोतंत पटतं. असाच काहीसा ‘भलताच’ गोंधळ मुंबईजवळच्या भिवंडीमध्ये घडला आहे. भिवंडी ग्रामीणमधल्या वॉर्ड क्रमांक ४ ‘ड’ मधला हा गोंधळ इतका व्हायरल झाला, की त्याचा या दोन्ही महिला उमेदवारांच्या कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप होऊ लागला आहे.

भिवंडी ग्रामीणमध्ये येत्या १५ जानेवारीला ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये शिवसेनापुरस्कृत अग्निमाता ग्रामविकास पॅनेलकडून वॉर्ड क्रमांक ४ ‘ड’मधून सौ. सुजाता कल्पेश म्हस्के आणि सौ. कोमल कल्पेश म्हस्के या दोन महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली. या दोघींची निवडणूक चिन्ह देखील वेगवेगळी आहेत. पण त्यांच्या नावापुढे लागलेलं पतीचं नाव आणि आडनाव देखील सारखंच असल्यामुळे त्यांची पंचाईत झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकाच बॅनरवर दोघींची नावं झळकल्यामुळे या दोघींचे पती एकच आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली! सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅपवर देखील ‘एकाच वॉर्डात नवरोबांनी आपल्या दोन पत्नींना निवडणुकीसाठी उभे केले’, अशा प्रकारचे विनोदी मेसेज व्हायरल केले जाऊ लागले.
तर यातली पहिल्या कल्पेशचं नाव कल्पेश बारक्या म्हस्के असं आहे, तर दुसऱ्या कल्पेशचं नाव कल्पेश सुरेश म्हस्के असं आहे. कल्पेश बारक्या म्हस्के हे कल्पेश सुरेश म्हस्केचे चुलत काका लागतात. सुजाता यांचं २०१६ साली कल्पेश बारक्या म्हस्के यांच्याशी लग्न झालं. तर कोमल यांचं कल्पेश सुरेश म्हस्के यांच्याशी २०१७ मध्ये लग्न झालं. पण आता या दोघींची नावं सारखीच झाल्यामुळे सगळाच घोटाळा होऊन बसला आहे.