मोहिते पाटलांचे खच्चीकरण की राजकीय मास्टरस्ट्रोक?; निकटवर्तीयांच्या हालचालींनी वाढवला संशय
करमाळा समाचार

मोहिते पाटलांच्या निकटवर्तीय आमदारांनी साथ सोडत भाजपा व मित्र पक्षांच्या कळपात जाऊन बसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण संबंधित आमदार नेमके गेल्याने फायदा होणार की तोटा हे येणारा काळ सांगेल. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने मोहित्यांना सोडल्यामुळे कमीत कमी त्या आमदारांना निधी उपलब्ध होऊन तालुक्याचा विकास होण्यासाठी मदत होईल अशी शक्यता वाढली. त्यामुळे नाराजी दाखवत सत्ताधारी गटाचा गेम तर मोहिते पाटील व समर्थक करत नाहीत ना? अशी संशयाची पाल चुकचुकु लागली आहे.

सध्या विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असून यामध्ये भाजपाचा उमेदवार एकतर्फी विजयी होईल अशी शक्यता व चर्चा असताना मोहिते पाटलांनी डाव टाकला व निवडणूक लागेल असे चित्र निर्माण केले. विशेष म्हणजे मागील निवडणुकांमध्ये त्यांचे समर्थक आमदार हे हळूहळू भाजपच्या गळाला लागल्याचे चित्र निर्माण केले गेले किंवा खरच ते जाऊन मिळाले. पण आजही निधीच्या बाबतीत त्यांचं अपेक्षित असे समाधान झालेले दिसून आलेले नाही. त्यामध्ये करमाळ्याची आमदार नारायण पाटील यांचा समावेश आहे. त्यांचा आदिनाथ अजूनही वंचित आहे.
यंदाच्या निवडणुकीत आपले निकटवर्तीय आमदार समोर जाऊन मिळालेले असतानाही मोठ्या प्रमाणावर विजयाचा दावा केला जात आहे. शिवाय जिल्ह्यात भाजपाची ताकद असतानाही एक हाती निवडणूक लढवली जात आहे. यामुळे एकतर्फी वाटणारी व बिनविरोध होणारी निवडणूक मात्र घोषित झाली आहे. त्याचा फायदा मतदारांना नक्कीच होणार आहे. जर निवडणूक झालीच नसती तर मतदारांनाही आपली “किंमत” लक्षात आली नसती. पण आज मोहिते पाटलांमुळे त्या मतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे आणि त्यातून ते विरोधी गटाचा पराभव करण्यास उत्साहाने लढताना दिसत आहे.

यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये करमाळा, माढा, सांगोला या ठिकाणचे आमदार भाजपाच्या गळाला लागल्याच्या चर्चा होत्या. ते बैठकांना उपस्थितही राहत होते. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत मोहिते पाटलांपेक्षा जास्त भाजपाला व evm प्रक्रियेला विरोध करणारे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर स्वतःच त्या कळपात जाऊन बसल्याने सगळी मोहितेंचीच गेम तर नाही ना? असा संशय आता वाढू लागला आहे. सोबत असले तर निधीची शक्यता नसते. त्यामुळे मोहितेंचा विरोध करून कमीत कमी तालुक्याच्या विकासासाठी व आपल्या समाधानासाठी निधी उपलब्ध होईल अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे.
पण अशी सर्व मंडळी भाजपाच्या व मित्र पक्षाच्या जवळ आल्याने या ठिकाणी जे मित्रपक्ष व भाजपाचे नेते निष्ठेने पक्षाचे व सत्ताधारी गटाचे काम करत राष्ट्रवादी च्या आमदारांचे मनसुबे पूर्ण होणार नाही याची काळजी घेत असतील. त्यांची मात्र आता गोची होताना दिसून येणार आहे. संबंधित आमदार हे राष्ट्रवादीत असल्याने आपण भाजपा व मित्रपक्षांमध्ये सक्रिय होऊन काम केल्यानंतर येणाऱ्या काळात याचा लाभ आपल्याला होईल या आशेने थांबून राहिलेले नेत्यांची मात्र येणाऱ्या काळात कशी अवस्था असेल हे सध्या गुलदस्त्यात आहे.
त्यामुळे सध्या मोहिते पाटील हे बॅकफूट वर गेले, आहेत, त्यांचे निकटवर्तीय विरोधकांना जाऊन मिळाले आहे, त्यांचा घरातील आमदार त्यांचं ऐकत नाही, ज्या आमदारांना त्यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले ते त्यांच्याकडे राहिले नाहीत या सगळ्या गोष्टी मुळे मोहिते पाटलांचे खच्चीकरण होतं आहे की मोहिते पाटील विरोधकांवर डाव टाकत आहेत? हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं कशातून काय घडत आहे हे स्पष्ट झाल्यानंतर अनेकांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ येऊ शकते.


