कोरोनाने हिरावले छत्र, पण ‘जगदीशब्द’ने दिला मायेचा हात
करमाळा (प्रतिनिधी):

कोरोनाच्या भीषण संकटाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. होत्याचे नव्हते झाले आणि निष्पाप चिमुरड्यांच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र हिरावले गेले. अशा कठीण काळात समाज म्हणून आपण या मुलांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते. हीच सामाजिक जाणीव ओळखून, प्रसिद्ध लेखक व व्याख्याते जगदीश ओहोळ आणि त्यांच्या ‘जगदीशब्द फाउंडेशन’ ने मागील पाच वर्षांपासून मायेची ऊब देत एक नवा आदर्श घालून दिला आहे.

करमाळा तालुक्यातील हिसरे, शेटफळ आणि सोगाव पश्चिम या गावांतील कोरोना काळात अनाथ झालेल्या आणि एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व जगदीश ओहोळ यांनी स्वीकारले आहे.
ही केवळ घोषणा न करता, सलग पाचव्या वर्षीही या मुलांच्या पंखांना बळ देण्याचे काम संस्थेने अत्यंत चिकाटीने केले आहे.

पाच वर्षांचा अविरत मायेचा प्रवास
शाळा सुरू होताच गरीब आणि अनाथ मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये, यासाठी जगदीशब्द फाउंडेशन सज्ज असते. यावर्षीही शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच तालुक्यातील या गरजू विद्यार्थ्यांना मोफत दप्तर बॅग, वह्या, कंपास पेटी, पेन, पेन्सिल आणि चित्रकला वही असे संपूर्ण शैक्षणिक साहित्य अत्यंत आदराने आणि प्रेमाने प्रदान करण्यात आले. शैक्षणिक साहित्याने भरलेली नवीन दप्तरं हातात पडताच या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर उमललेले हसू आणि त्यांच्या डोळ्यांतील चमक खूप काही सांगून जाणारी होती.
हिसरे येथे हे शैक्षणिक साहित्य प्रदान करताना
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सारिका पवार, बिभिषण भोसले, वैजयंता चव्हाण, शारदा शिंदे, सुजाता कोंडलकर, काजल सातपूते, लक्ष्मी काळे, शेख चाचा, शेटफळ येथे नागनाथ माने व परिवार तर सोगाव पश्चिम प्रगतशील बागातदार सुनील सरडे, माजी सरपंच मारुती पवार, माजी सरपंच स्वप्निल गोडगे, सुनील सरडे ॲड.मनोज घनवट, महेश भोसले, गोरख गवळी, निशांत गोडगे, सचिन सरडे, सार्थक गोडगे, लक्ष्मण भोसले, दत्ता भोसले, हर्षद भोसले, प्रविण भोसले यांच्यासह माता पालक, विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया
“संकटं येतात आणि जातात, पण त्यामुळे मुलांचे शिक्षण थांबता कामा नये. ही मुलं आमची आहेत, समाजाची आहेत. त्यांना कधीही आपण पोरकं आहोत असं वाटू न देणे, हेच आमच्या जगदीशब्द फाउंडेशनचे ध्येय आहे. हा केवळ मदतीचा हात नाही, तर आमचे कर्तव्य आहे.”
जगदीश ओहोळ (लेखक, व्याख्याते व संस्थापक, जगदीशब्द फाउंडेशन)
कोरोना काळात आमच्या सोगाव पश्चिम गावातील मृत्यूचा दर अधिक होता. त्यामुळे अनेक विद्यार्थी अनाथ व एकल पालक झाले. त्यातील अनेक पाल्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्या काळात जगदीश ओहोळ सरांनी जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने त्या अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतले. मागील पाच वर्षापासून ते आमच्या गावातील या विद्यार्थ्यांना दरवर्षी येऊन शैक्षणिक साहित्य प्रदान करतात. हा आमच्या गावासाठी व या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा आधार आहे. यामुळे गावातील ते विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहेत व याबद्दल आम्ही जगदीशब्द फाउंडेशनचे आभारी आहोत.
-स्वप्नील गोडगे, माजी सरपंच, सोगाव पश्चिम
जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने आमच्या गावातील या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. त्यामुळे हे विद्यार्थी नक्की शिक्षणात पुढे जातील. तसेच त्यांच्या आई-वडिलांचा शैक्षणिक साहित्य खरेदीचा भार ही कमी झाला आहे. त्यामुळे ते पालक ही आनंदित आहेत. जगदीशब्द फाउंडेशनच्या या कार्याबद्दल आम्ही शाळा व गावाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो.
– सारिका पवार,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिसरे


