करमाळासोलापूर जिल्हा

वरदायिनी हाऊसफुल्ल – धरणग्रस्त सुखावला ; उजनीत दौंड येथुन 60 हजाराहुन जास्त विसर्ग

करमाळा समाचार -संजय साखरे


सोलापूर जिल्ह्याचे वरदायिनी असलेले उजनी धरण आज दुपारी १०१.४५% भरले असून सध्या धरणात दौंड इथून ६०३४१ qusek एवढा पाण्याचा विसर्ग येत आहे. तर धरणातून ३०००० qusek एवढा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे.
यावर्षीही लवकरच भीमेच्या खोऱ्यात चांगला पाऊस झाला. आणि धरणानं शंभरी ओलांडली.

या उजनी धरणाचे स्थान आणि महत्त्व सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या आणि पर्यायाने संपूर्ण जनतेच्या दृष्टीने अन्यसाधारण आहे. सोलापूर जिल्ह्यातील एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा पुण्याला शाळेत किंवा नोकरीला असला तर त्याचा बाप त्याची चौकशी करण्या अगोदर “पोरा पुण्याला पाऊस आहे का”? असे विचारतो इतकं त्या धरणाचे महत्त्व आहे. सोलापूरच्या लोकांना पुण्याच्या पावसाची एवढी ओढ का ? तर त्याचं कारण आहे हे उजनी धरण.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त दुष्काळी जिल्हा म्हणून सोलापूरची अख्या महाराष्ट्राला ओळख आहे. पण याच सोलापूर जिल्ह्याने उजनीचे पाणी शेतकऱ्यांच्या रानात खळाळल्यानंतर कात टाकली आणि महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्हा अशी असलेली ओळख पुसून महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा अशी आपली ओळख निर्माण केली. गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील 33 साखर कारखान्यांनी साखरेचे उत्पादन घेतलं. सद्यस्थितीत उजनी धरणातून सोलापूर, पुणे आणि नगरसह एक लाख ९७ हजार हेक्टर एवढ्या क्षेत्राला पाणीपुरवठा होतो.

परतीच्या पावसावर रब्बीची ज्वारी पिकवणारा सोलापूर जिल्हा या उजनी धरणामुळे कृषी क्रांतीत अव्वल होऊ पाहत आहे. जून १९८० ला उजनी धरण पूर्ण झाल्यापासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी खळाळू लागल. आणि पुण्या मुंबईला कामाला जाणारी शेतकऱ्यांची पोरं शेती करू लागली. उसासारखं शाश्वत उत्पन्न देणाऱ्या नगदी पिकाचे उत्पादन घेऊ लागली. ऊसाचा पैसा आल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरावरचे पाचट जाऊन तिथे रुबाबदार बंगले उभे राहिले. दारामध्ये चार चाकी आलिशान गाड्या उभ्या राहिल्या. ही सगळी किमया झाली फक्त उजनी धरणामुळेच…….

१९६६ ला उजनी धरणाचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी केले तर धरण पूर्ण होण्यास १९८० साल उजडले .त्यानंतर शरद पवारांनी यशवंतरावांच्या या योजनेला मूर्त स्वरूप दिले. सात मार्च १९६६ रोजी उजनी धरणाचे भूमिपूजन तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत झालं. नाईक यांनी नारळ वाढवला आणि यशवंतराव कुदळ मारण्यासाठी पुढे झाले. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. धोतराचा सोगा डाव्या हाताने उचलून धरत त्यांनी कुदळ खाली टाकली. थोडेसे पुढे सरसावले. नदीपात्राच्या दिशेने दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. गदगदल्या आवाजात ते बोलले, “विठ्ठला मला माफ कर बाबा, मी औचित्य भंग करतोय,तुझी चंद्रभागा मी अडवलीय, मला पदरात घे.

यशवंतरावांच्या दूरदृष्टीमुळेच आज सोलापूर जिल्ह्याचा कायापालट होऊ शकला. आज चार चाकी आलिशान गाडीत फिरणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांनी यशवंतरावांचे हे उपकार कधीही विसरले नाही पाहिजेत. पंडित नेहरूंनी एका ठिकाणी म्हटल, “*धरण ही आधुनिक भारताची मंदिरे आहेत.”

फक्त ऊसच नाही तर आता या धरणातील पाण्यावर अवलंबून असणारा शेतकरी विविध फळांचे उत्पादन घेऊ लागला आहे. उजनीचे पाणी सोलापूर जिल्ह्याच्या शेतीची तहान तर भागवतेच पण सोलापूर शहराची तहान देखील भागवते. म्हणूनच सोलापूरच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले हे उजनी धरण भरत मात्र पुण्याच्या पावसानं. म्हणून तर आम्ही वाट पाहतो पुण्याच्या पावसाची. पंढरपूरचा पांडुरंग ,सोलापूरचे सिद्धेश्वर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, मंगळवेढ्याचे संत दामाजी ही जशी आम्हां सोलापूरकरांची दैवते तसं उजनी धरण सुद्धा दैवत!

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE