करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

झोपेत असलेल्या तरुणाच्या डोक्यात हातोडा मारून खून; करमाळ्यात खळबळ

करमाळा :

झरे फाटा येथील स्वराज्य सिमेंट पाईप कंपनीच्या रहिवासी खोलीत झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने मारून खून केल्याची धक्कादायक घटना 11 ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी जयंतकुमार उमेश शर्मा (रा. चिकनी, ता. रहुआ, जि. सहरसा, बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महादेवकुमार मनोज शर्मा व आरोपी जयंतकुमार शर्मा हे दोघेही मूळचे बिहार राज्यातील असून सध्या झरे फाटा येथील स्वराज्य सिमेंट पाईप कंपनीत राहत होते. 11 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जयंतकुमार हा खोलीचा दरवाजा बंद करून झोपला होता. महादेवकुमार याला त्याच खोलीत झोपण्यासाठी जायचे असल्याने त्याने खिडकीतून बारीक दगड मारून जयंतकुमारला उठवले.

या प्रकारावरून दोघांमध्ये वादावादी व शिवीगाळ झाली. त्यानंतर रात्री सुमारे 11.40 वाजता जयंतकुमारने झोपलेल्या महादेवकुमारच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गंभीर दुखापत झाल्याने महादेवकुमारचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी शिवम बद्री शर्मा यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेले लोखंडी हातोडे पोलिस तपासाचा महत्त्वाचा भाग असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. तसेच करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ढोरे करीत आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE