करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

२१ वर्ष उल्लेखणीय योगदान ; आज शिक्षकदिनी राज्य शासनाकडुन सन्मान

करमाळा – नाना घोलप (९४०४६९२४४०)

पर्यावरण, वकृत्व, नाट्य, शिष्यवृत्ती व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाच्या सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने खातगाव क्रमांक दोन ता. करमाळा येथील शिक्षक बाळासाहेब बोडखे यांना सन्मानित करण्यात आले आहे. स्वतः शहरी भागात राहिलेले पण ग्रामीण विद्यार्थ्यांशी नाळ जोडली रहावी म्हणून ग्रामीण मध्ये राहुन विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे काम बोडखे करतात तर विविध पुरस्कारासह बोडखे यांनी पर्यावरणातुन शाश्वत शिक्षण हे मराठी व इंग्रजी माध्यमातून ८० उपक्रम घडवलेले पुस्तक लिहले आहे.

बाळासाहेब पुंडलिक बोडखे (वय ४३) मुळ रा. नगर जिल्हा अहमदनगर यांचे शिक्षण एम. ए. बी. एड. डी. एड. असे झालेले आहे. त्यांची आजपर्यंत एकूण २१ वर्षाची सेवा झाली आहे. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या शाळांवर कामही केले आहे. त्यामध्ये भिवरवाडी (२००२ ते २०११), कोंढार – चिंचोली (२०११ ते २०१९) व खातगाव क्रमांक दोन (२०१९ ते आजपर्यत) या शाळेचा समावेश आहे. कोंढार चिंचोली येथे काम करताना २०१६-१७ मध्ये बाळासाहेब बोडके यांनी पर्यावरण सेवा योजने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरकपूरक शिक्षण देण्यास सुरुवात केली.

*सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दिग्दर्शक मंजुळेंचा प्रेक्षकांशी संवाद ; दिलखुलास गप्पा*

पाणी गळतीमध्ये किती प्रमाणात पाणी गळते, त्यामुळे कोणते कोणते नुकसान होऊ शकतात. त्याशिवाय पाण्यातील घटक व त्याची इतर माहिती परीक्षण करून समजावून सांगणे, ६२ प्रकारच्या पक्षांचा अभ्यास करून घेणे, रानभाज्यांची माहिती, औषधी वनस्पतींची लागवड, विविध बीज संकलन, विविध मुलाखती अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षित केले. त्यामुळे बाळासाहेब बोडके यांना पर्यावरण विषयक संशोधन कार्यास विप्रो कंपनीचा राष्ट्रीय स्तरावरील एक लाख रुपये बक्षीस व पाच विद्यार्थ्यांसह मोफत विमान प्रवास अस पारितोषिकही मिळालेले आहे.

लोकसहभागातून शाळेचा कायापालट कसा करावा हे प्रत्यक्ष दाखवत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणाची वारी बालेवाडी येथे सहभाग घेत मार्गदर्शन केले होते. तर शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पदक मिळवण्यात योगदान दिले आहे. गुरुजींच्या विद्यार्थ्याने सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिला खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील पदक मिळवला. तर ज्या शाळांवर बोडखे यांनी काम केले त्या कोंढार चिंचोली व भिवरवाडी जिल्हास्तरावर अव्वल आणल्याचा सन्मानही झाला.

शिष्यवृत्ती परीक्षेत प्रभावी मार्गदर्शन केल्यामुळे शेतमजूर व शेतकऱ्यांची मुले गुणवत्ता यादीत आली, त्यामुळे जिल्हा परिषदेकडून आदर्श शिष्यवृत्ती मार्गदर्शक २०११ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर २०१७ मध्ये सोलापूर जिल्हा परिषदे द्वारा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, पर्यावरणातील निर्णायक योगदानाबद्दल पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र राज्याकडून सन्मानित. तसेच शाळेमध्ये नियोजनबद्ध आणि सेंद्रिय परसबाग उभी करून सेंद्रिय शेतीचे महत्व आणि अनुभवातून शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे विविध कार्य केल्यामुळे बोडखे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ज्यांनी आम्हाला घडवलं त्या आई-वडिलांचे चरणी मी हा पुरस्कार अर्पण करतो. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे . माझा प्रत्येक विद्यार्थी हा एक जबाबदार नागरिक म्हणून देशासाठी घडवावा हाच माझा आजपर्यंतचा प्रयत्न आहे आणि भविष्यातही राहील.
– बाळासाहेब बोडखे, पुरस्कारप्राप्त शिक्षक. खातगाव क्रमांक दोन ता. करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE