करमाळा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह; आरोपी ऑनलाईन तपासात ऑफलाईन
करमाळा :

करमाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप करत पीडित महिलेच्या पतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे करमाळा पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आरोपीचा क्रमांक whats app वर सक्रिय असल्याचे पुरावे असल्याचे सांगण्यात आले आहे.

अर्जदार अर्जुनसिंग विजयसिंग परदेशी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांची पत्नी आशा अर्जुनसिंग परदेशी (वय 38) यांनी मनिषा रविंद्र शिंगाडे, ओम रविंद्र शिंगाडे आणि समृद्धी रविंद्र शिंगाडे यांच्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून 24 एप्रिल 2026 रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी 29 एप्रिल 2026 रोजी करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यातील एक आरोपी मनिषा रविंद्र शिंगाडे हिला अटक करण्यात आली आहे. मात्र उर्वरित दोन आरोपी ओम रविंद्र शिंगाडे व समृद्धी रविंद्र शिंगाडे हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.

तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरिजा म्हस्के यांना आरोपींबाबत वेळोवेळी माहिती देऊनही त्यांना ताब्यात घेण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. दरम्यान, उर्वरित आरोपींना तातडीने अटक करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अर्जदार अर्जुनसिंग परदेशी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे केली आहे.

