काय हा प्रकार? – वाशिंबे प्रकरणात चोरांची चांदी! ; ग्रामस्थ्यांसह चोरही बुचकळ्यात
करमाळा समाचार

नुकतीच वाशिंबे येथील भैरवनाथ मंदिरात चोरी झाली. यावेळी या ठिकाणाहून चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये 26 ग्राम सोने तर 800 ग्रॅम चांदी चांदीचा समावेश आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे सदरचा मुद्देमाल हा पाच लाख 64 हजार रुपयांचा असायला हवा, पण पोलीस नोंदीत याचा निम्मा भाव लावल्याने चर्चांना उधान आले आहे. यामुळे ग्रामस्थांसह चोरही बुचकळ्यात पडणार हे नक्की. सदर प्रकरणाचे गांभीर्य कमी करण्याच्या उद्देशाने भाव कमी लावण्याचे बोलले जात आहे. पण यामुळे संबंधित चोरांचे फावणार असल्याचेही दिसत आहे.

वाशिंबे येथील भैरवनाथ मंदिर ग्रामदैवत असल्याने या ठिकाणी सढळ हाताने लोक दानधर्म करताना दिसतात. त्यामुळे या ठिकाणी सोने चांदीची आवकही होते. यामुळे या ठिकाणी जवळपास पाच ते सात तोळ्यांपर्यंत सोने तर दोन किलो पेक्षा जास्त चांदी असल्याचे अध्यक्ष व समितीच्या वतीने सांगण्यात आले. पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर मात्र पावती मागण्यात आली. त्यामुळे दान झालेल्या सोन्याची पावती कशी देणार हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे जेवढ्या पावत्या उपलब्ध होत्या त्याच पावत्यांची नोंद झाली असल्याचे दिसते.
जरी पावतीप्रमाणे नोंद झाली असली तरी संबंधित सोने व चांदीच्या योग्य भाव फिर्यादीत नोंदवणे गरजेचे होते. त्यामुळे चोरीचे स्वरूप व चोर पकडण्यासाठी वेगवान प्रक्रिया राबवली गेली असती. पण या ठिकाणी झालेल्या चोरीतील सोने व चांदीचे भाव हे निम्म्याने दाखवल्याने याचं प्रमाण हे अत्यल्प वाटू लागले आहे. शिवाय ज्यावेळी सदरची चोर पकडले जातील त्यांच्याकडून नेमकी वसुली किती करायची हा प्रश्न राहणार आहे.

पोलीस ज्यावेळी मुद्देमाल पकडतात त्यावेळी ज्या पद्धतीने चालू भाव संबंधित मुद्देमालाला लावला जातो. तसाच चोरीला गेलेल्या मुद्देमाला भाव का लावला जात नाही हा साधा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

