अरे बाबांनो… कोट्यवधींच्या विकासगप्पा पुन्हा हाणा ; गावागावच्या गरजा बघा, तालुक्यातील मूलभूत प्रश्न सोडवा
करमाळा समाचार

तालुक्यात विकासकामांच्या घोषणा आणि कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या मंजुरीची चर्चा नुसती रंगत नाही तर यावरून श्रेयवाद उफाळला आहे. अरे बाबानो तालुक्याच्या एका टोकाचा रस्ता दुसऱ्या तालुक्यात जातोय यातून मोजक्या गावांचा फायदा होईल त्यापेक्षा हा विकास लोकांसाठी का ठेकेदारसाठी आहे हा पुढचा प्रश्न? पण आजही गावागावतील मूलभूत प्रश्नांचे काय? कुंभेज सारख्या गावात स्मशान भूमीच नाही या पेक्षा मोठी शोकांतिका काय असेल? हजारो कोटींच्या गप्पा मारण्यापेक्षा आजही आपण किती मागासलेले आहोत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तालुक्यात वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी सत्ता उपभोगली आहे. यातून हजारो कोटींचा निधी करमाळा तालुक्याला मिळाला देखील आहे. परंतु आजपर्यंत एवढा निधी मिळालेला असताना खरंच आपले मूलभूत प्रश्न सुटलेले आहेत का? तो निधी ठेकेदार व कार्यकर्ता विकास इथपर्यंत मर्यादित राहून त्यातून आपल्या पायाभूत सुविधा मिळालेल्या आहेत का? याचा जाब विचारण्याची वेळ सध्या आलेली आहे. तालुक्यात गावोगावात आजही शेतीचे सोडा पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, वाडी वस्तीवर जाण्यासाठी रस्ते तर दूरच गावात जाण्यासाठी ही रस्ते नाहीत.
महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार यांच्या आराखड्यात असणारी रस्ते तालुक्यातील जातात याचाच आधार घेऊन स्थानिक नेते मंडळींना रस्ते झाल्यानंतर हा विकास दाखवण्यात अधिक सक्रिय होताना आपण पाहिलेले आहे. याशिवाय महत्त्वाचे प्रश्न सोडून इतर बाबींसाठी निधी मंजूर झाला त्याचा तालुक्याला कितपत फायदा होणार आहे याचाही अभ्यास केला गेला पाहिजे. केवळ निधींची आकडे व कामाचे आवढव्य स्वरूप पाहून विकास केला गेला किंवा त्याचा गवगवा करण्यात काहीच अर्थ नाही.

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचे जाऊ द्या पण स्वातंत्र्यानंतरही जर एखाद्या गावाला आजपर्यंत आपण स्मशानभूमी देऊ शकत नसू, येथील प्रलंबित प्रश्न सोडवले जात नसतील तर आपण आपली स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काय अर्थ आहे. एका शुल्लक चुकीमुळे कुंभेज गाव आजही ग्रामपंचायतची स्वतःची 21 गुंठे जागा असतानाही स्मशानभूमीपासून वंचित आहे. तो प्रश्न आज तागायत सुटलेला नाही. यासाठी ग्रामस्थांना चक्क उपोषण करण्याची वेळ आली. तरीही तो प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. यापेक्षा जास्त काय शोकांतिका असू शकते.
गावकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता गाव पुढारी तसेच तालुक्याचे मोठे नेते मैदानात उतरतील आणि आम्ही कशा पद्धतीने तुमचे पाठीराखे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतील, अरे पण आजपर्यंत त्या लोकांनी कशा पद्धतीने आपल्या गावातील अंत्यसंस्कार केले असतील. ऊन वाऱ्याचं एक वेळ बाजूला ठेवा पण पावसाळ्यात त्या मृतदेहांची काय अवस्था असेल याचा कधी कोणी विचार केला आहे का ? जर आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी गावकऱ्यांना देऊ शकत नसु तर मोठ्या पोकळ गप्पा मारण्यात काय अर्थ आहे. सदरची बाब ही पुढारी म्हणून तुम्हाला तर पत्रकार म्हणून आमच्यासारख्या लाजिरवाणी आहे.

