रोग रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला!! ; चूक कोणाची
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे काम करण्यात आले. परंतु ज्या ठिकाणी बुरुज किंवा भिंत पडलेली आहे व त्यापासून लहान मुले व नागरिकांना धोका होऊ शकतो त्या ठिकाणची दुरुस्ती करण्याऐवजी किल्ल्याच्या आतील बाजूची दुरुस्ती केल्याने आजही धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. यासाठी आणलेला दोन कोटीचा निधी हा वाया गेल्याची दिसून येत आहे. त्यामुळे आजार रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला अशा पद्धतीची गत झाली आहे.

करमाळा शहरातील ऐतिहासिक असा चारही बाजूने भिंती असलेला किल्ला असून या किल्ल्याच्या आतील व बाहेरील बाजूने बऱ्याच ठिकाणची बुरुज व भीती पडलेले आहेत. यासाठी तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून पुरातन विभागाकडून दोन कोटी मंजूर करण्यात आले होते. आमदार शिंदे यांनी मंजूर केलेले पैसे कुठे वापरावे याचं भान देखील संबंधित अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून आले. त्यांनी सुचवलेली कामे हे जनतेच्या उपयोगाची नसल्याचे दिसून आले.
ज्यावेळी कामाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी किल्ल्याच्या आतील बाजूने ज्या रस्त्याने विद्यार्थी नागरिक येजा करतात त्या ठिकाणची भिंत दुरुस्त करणे अपेक्षित असताना त्या ऐवजी खंदक असलेल्या बाजूने बुरुजाची दुरुस्ती करण्यात आली. मुळातच खंदकाच्या बाजूच्या बुरुजाची किंवा भिंतीची दुरुस्ती केली नसती तरीही इतका धोका नसला असता पण आतील बाजूने विद्यार्थी व नागरिक ये जा करतात त्या भागाची दुरुस्ती करणे गरजेचे होते.

केवळ काम केल्याचा देखावा आणि ठेकेदार जगवण्याचे काम यातून झालेले दिसून येत आहे. स्थानिकांना अपेक्षित होते सुरुवातीला सोपे काम हाती घेऊन नंतर रस्त्याचे बाजूचे काम घेतले जाणार आहे. त्यामुळे नागरिक ही शांत होते. परंतु आता दोन वर्ष उलटली तरी त्या कामासाठी पुढचा निधी उपलब्ध नाही व कामही झाले नाही. त्यामुळे निधी वाया गेल्याची बोलले जात आहे. त्यामुळे सध्या आजारी रेड्याला इंजेक्शन द्यायचे ऐवजी पखालीला इंजेक्शन दिल्याचे दिसत आहे. आता तात्पुरती उपाययोजना राबवण्याची गरज आहे.


