करमाळ्यात पहाटे घराला आग; हजारो रुपयांचे नुकसान
करमाळ्यात पहाटे घराला आग; हजारो रुपयांचे नुकसान
रंभापुरा भागातील घटना; स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

करमाळा शहरातील गजबजलेल्या रंभापुरा भागात पहाटे तीनच्या सुमारास एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत कामानिमित्त करमाळ्यात वास्तव्यास असलेल्या प्रदीप अडसूळ यांच्या कुटुंबाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने आग लागली त्यावेळी घरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घराला लागलेली आग वेळीच आटोक्यात आणली नसती तर ती आसपासच्या दाट वस्तीमध्ये पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक तरुणांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. अनिरुद्ध अडसूळ, नितीन ढाणे आणि आकाश गरड यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. रात्रीच स्थानिक मुलांनी प्रयत्न करून आग विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली होती. मात्र, बराच वेळ होऊनही अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. स्थानिक तरुणांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठे नुकसान टळले.


