पुराचा फायदा घेत पाण्याची मोटार चोरली; गावातच विकल्याने चोरी उघडकीस!
करमाळा :

भालेवाडी येथील शेतकऱ्याची 7.5 एच.पी. क्षमतेची टेक्समो कंपनीची पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार चोरीस गेल्याची तक्रार करमाळा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सदर मोटार गावातील एका व्यक्तीच्या विहिरीत वापरात असल्याचे आढळून आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

फिर्यादीच्या जबाबानुसार, सिना नदीपात्रात देवई जाधव यांच्या शेताजवळ शेताला पाणीपुरवठा करण्यासाठी मोटार ठेवण्यात आली होती. सप्टेंबर २०२५ मध्ये सिना नदीला आलेल्या पुरानंतर मोटार ठेवलेल्या ठिकाणी पाहणी केली असता मोटार आढळून आली नाही. मोटारीला जोडलेला तीन इंची पाईप कापलेला तसेच केबलही कापलेली दिसून आल्याचे फिर्यादीने सांगितले.
पुरामुळे अनेक मोटारी वाहून गेल्याची माहिती असल्याने आपली मोटारही पुरात वाहून गेली असावी, असा संशय असल्याने त्यावेळी पोलिसांत तक्रार केली नसल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

दरम्यान, ३० सप्टेंबर २०२६ रोजी गावातून मिळालेल्या माहितीनुसार सदर मोटार गावातील शेतकऱ्याच्या विहिरीत असल्याचे समोर आले. मोटार विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तिचा सीरियल क्रमांक 70101021305 असल्याचे आढळून आले. हा क्रमांक आपल्या मोटारीचा असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
मोटारबाबत विचारणा केली असता ती सहा महिन्यांपूर्वी प्रमोद नावाच्या एकाकडून खरेदी केली असून, खरेदीवेळी ही मोटार पुरात सापडल्याचे सांगण्यात आले होते, अशी माहिती संबंधित व्यक्तीने दिल्याचे फिर्यादीच्या जबाबात नमूद आहे.
या प्रकरणी प्रमोद, रा. भालेवाडी यांनी मोटार संमतीशिवाय लबाडीने चोरून नेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. चोरीस गेलेल्या मोटारीची किंमत सुमारे ३५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, मोटार नेमकी पुरात वाहून गेली की चोरी झाली, तसेच ती संबंधित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचली याबाबतच्या बाबी तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.


