करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मंत्री तानाजी सावंत माजी आमदार पाटील भेट ; कटुता कमी करण्याचा प्रयत्न ?

करमाळा – नानासाहेब घोलप

मागील काही दिवसांपासून मंत्री तानाजी सावंत व माजी आमदार नारायण पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर आता पडदा पडताना दिसत आहे. नुकतच करमाळा दौऱ्यावर आलेले तानाजी सावंत यांनी आवर्जून जेऊर येथे माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली आहे. तर काही काळ त्यांच्यासोबत चर्चाही झाली आहे. यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांचे तालुक्यातील राजकारणाचे महत्त्व अद्यापही अबाधित असल्याचे दिसून येते.

2019 च्या निवडणुकांमध्ये माजी आमदार नारायण पाटील यांना डावलून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना तिकीट मिळवून देण्यात मंत्री तानाजी सावंत मोठा वाटा होता. त्यावेळी विद्यमान आमदार असतानाही माजी आमदार नारायण पाटील यांना डावलल्याने शिवसेनेला महागात पडले होते. तालुक्यातील जागा तर गेलीच शिवाय शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती. तर दरम्यानच्या काळात माजी आमदार यांनी बऱ्याच वेळा मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे हेलपाटे मारूनही त्यात कोणताही बदल झाला नव्हता. म्हणून पाटील यांनी त्यावेळी शिवसेना सोडली व अपक्ष निवडणूक लढवली होती. कोणत्याही पक्षाशिवाय त्यांची ताकद काय आहे ते त्यांनी दाखवून दिले होते.

शिवसेनेतील फुटी नंतर शिंदे सरकार अस्तित्वात आले व माजी आमदार नारायण पाटील हे कायम शिंदे यांच्या जवळचे नेते राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी शिंदे सोबत जाणे पसंत केले. आपसूकच त्यामुळे मंत्री तानाजी सावंत यांच्याशीही जवळीक वाढली. मागे आलेली कटूता दोघेही विसरून काम करू लागले. परंतु मधल्या काळात पुन्हा एकदा आदिनाथच्या कारखान्याच्या एका निर्णयावरून दोघात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत होते. ज्यावेळी कारखान्यावर गुळवे यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना विरोध करत माजी आमदार नारायण पाटील यांनी कारखाना खाजगी हातात जाण्यापासून रोखला होता व सभासदांना आपण कारखाना पुन्हा चांगल्या स्थितीत आणू असे आश्वासन दिले होते. परंतु कारखान्यावर प्रशासक मंडळ नेमले व तेव्हा पाटील गटाला यापासून दूर ठेवण्यात आले.

ज्यावेळी कारखान्यावर प्रशासक मंडळ नेमण्यात आले तेव्हापासून माजी आमदार नारायण पाटील पुन्हा सावंत यांच्या जवळ तितकेसे दिसले नाहीत. यावरूनच सावंत यांनी प्रशासक मंडळ नेमताना पाटील यांना विश्वासात न घेतल्यानेच पाटील नाराज असल्याचे बोलले जात होते. शिवाय कारखाना ही अडचणीत आला. त्यानंतर शिवसेनेने करमाळ्यात घेतलेला मेळाव्यातही जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी बऱ्याच वेळा संपर्क करूनही माजी आमदार नारायण पाटील हे संबंधित मेळाव्याला आले नव्हते. तर रिकाम्या खुर्च्यांनी चर्चांना उधाण आले होते. यावरून पाटील व सावंत यामध्ये दुरावा असल्याचे दिसून येत होते. दोन्ही बाजूंनी याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण मिळाले नसते तरी चर्चा मात्र रंगत होत्या.

तर 2019 च्या विधानसभेपूर्वी तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांच्या स्वागताला थांबलेले असतानाही सावंत यांनी टाळले होते. त्याचे पडसाद तिकिटापर्यंत जाऊन पोहोचले. पण आता पुन्हा एकदा एका दौऱ्यावर करमाळ्यात आल्यानंतर सावंत यांनी आवर्जून माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली आहे. यातून तालुक्याच्या राजकारणात पाटलांचा दबदबा कायम असल्याचे दिसून येते. येणाऱ्या काळात पाटील कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. पण लोकसभेपूर्वी घेण्यात आलेली ही भेट नक्कीच शिवसेनेला तालुक्यात उभारी देणारी ठरू शकेल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE