करमाळासोलापूर जिल्हा

खरीप हंगाम पूर्वतयारी निमित्ताने बैठकीचे आयोजन ; विविध विषयांवर केले मार्गदर्शन

करमाळा समाचार

मौजे पोंधवडी येथे दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय ,करमाळा व मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, केतुर यांच्यामार्फत खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. बैठकीसाठी कृषी विभागाचे उमाकांत जाधव हे उपस्थित होते. तसेच अजिनाथ भिसे, शत्रुघ्न वाघ, नवनाथ काळे, भरत ननवरे, मच्छिं द्र साळवे,अनारसे व इ तर शेतकरी बांधव उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये श्री उमाकांत जाधव यांनी खरीप हंगामातील कडधान्य पिके तूर, मूग ,उडीद, मटकी तृणधान्य पिके मका, बाजरी गळीत धान्य पिकांमध्ये सूर्यफूल, सोयाबीन आणि भुईमूग नगदी पीकामध्ये ऊस या पिकांबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.
कडधान्य पिकामध्ये उडीद या पिकाचे करमाळा तालुक्यातील क्षेत्र मागील दोन-तीन वर्षापासून सतत वाढले आहे सदर पिकाबाबत वाण निवडीपासून ते काढणीपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन श्री जाधव यांनी केले.

तृणधान्य पिकामध्ये मका या या पिकाची सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषता अमेरिकन लष्करी अळी चे व्यवस्थापन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यामध्ये प्रथम शेतकरी बांधवांनी घाबरू नये मका पिकाची पाने कुरुतडल्यासारखी सारखे दिसतात त्यामुळे शेतावर दिसणारे चित्र विदारक दिसते. परंतु वेळेत किड नियंत्रण केल्यास उत्पादनात येणारी घट कमी करता येते त्यामुळे किडीच्या प्रादुर्भावाने घाबरून जाऊ नये असे आवाहन उमाकांत जाधव यांनी केले. मक्यावरील लष्करी डाळीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन केल्यास कीड चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येते.

वनस्पतिजन्य कीडनाशके वापर, अंडी व आळ्या वेचून नष्ट करणे, पक्षी थांबे यांचा वापर करणे, परभक्षी कीटक यांचा वापर करणे, परोपजीवी कीटक यांचा वापर करणे व जैविक कीडनाशकांचा वापर करणे या सर्वांचा वापर केल्यानंतरही कीड नियंत्रण नियंत्रणामध्ये नाही आली तर खालील शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी. 10 ते 20 टक्के प्रादुर्भावित झाडे आढळल्यास थायमेथॉक्झाम( 12.6 टक्के) अधिक लॅबडा सायहॅलोथ्रीन( 9.5 झेड सी) किंवा स्पीनोटेरम( 11.7 एस सी) किंवा क्लोरअट्रानीलीप्रोल (18.5 एस सी) या किटकनाशकांची शिफारशीत मात्रा घेऊन फवारणी करावी. कणसे लागले नंतर या कीटकनाशकांची फवारणी करू नये यासाठी जैविक कीटकनाशकांचा किंवा शक्य असल्यास अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात असे सांगितले.

गळीत धान्य पिकांमध्ये सूर्यफूल भुईमूग व सोयाबीन या पिकांबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. करमाळा तालुक्यामध्ये सोयाबीन पीक खूप कमी प्रमाणात घेतले जाते श्री जाधव यांनी सोयाबीन क्षेत्र वाढण्यासाठी शेतकरी बांधवांनी जोड ओळ पद्धतीचा अवलंब करावा असे शेतकरी बांधवांना सांगितले. तसेच सूर्यफूल पिका वरील रोग व किड व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

बी बी एफ (रुंद वरंबा सरी) या यंत्राबाबत माहिती श्री उमाकांत जाधव यांनी दिली. यामध्ये हे यंत्र मुग तुर उडीद सोयाबीन मका या पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. बीबीएफ यंत्राने खर्चात 20 ते 25 टक्के बचत होते .उत्पन्नामध्ये 25 ते 30 टक्के वाढ होते. बीबीएफ यंत्राने पेरणी केल्यास मूलस्थानी जलसंधारण साधले जाते. पावसाचा खंड पडल्यास पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते. जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी जाण्यास मदत होते. पिकास मुबलक हवा सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते. पिकामध्ये आंतरमशागत करणे उभ्या पिकात सरीमधून ट्रॅक्टर/ मनुष्य चलित फवारणी यंत्राद्वारे कीटक नाशक फवारणी करणे सोयीचे होते. सोलापूर जिल्हा अवर्षणप्रवन क्षेत्रात येत असल्याने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या यंत्राने पेरणी करावी असे आवाहन श्री उमाकांत जाधव यांनी केले.

बीज प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यामध्ये बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी बीज प्रक्रिया सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची करावी. यानंतर कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर एक तास नंतर रायझोबियम/ ऑझोटोबॅक्टर बीजप्रक्रिया करावी. सर्वात शेवटी पीएसबी( स्फुरद विरघळणारे जिवाणू) ची बीज प्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया चे फायदे यामध्ये जमिनीतून बियाद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्याची उगवण क्षमता वाढते. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होते. आणि महत्वाचे बीजप्रक्रिया साठी खर्च खूप कमी येतो असे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाडीबीटी वर अर्ज कसा करायचा महाडीबीटी मध्ये समाविष्ट असलेले घटक तसेच निवड झाल्यानंतर करावयाची कार्यवाही इत्यादीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE