पोलिसांची सतर्कता, गावकऱ्यांचे धाडस; जातेगाव चोरीप्रकरणातील संशयित जेरबंद
वटपौर्णिमेच्या दिवशी महिलेला लुटून पळालेल्या चौघांना कोर्टी येथील युवकांच्या मदतीने करमाळा पोलिसांनी पकडले

करमाळा समाचार | प्रतिनिधी
करमाळा पोलिसांची तत्परता आणि कोर्टी , गोरेवाडी परिसरातील गावातील युवकांचे धाडस यामुळे जातेगाव परिसरात चोरी करून पसार झालेल्या चार संशयितांना पकडण्यात यश आले. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सुमारे १० ते १२ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

वटपौर्णिमेनिमित्त गावोगावी महिला वडाच्या पूजेसाठी बाहेर पडल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी जातेगाव परिसरात एका महिलेच्या गळ्यातील दागिना हिसकावून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीस कर्मचारी श्री. किरण पवार आणि सचिन हिंगमिरे, अझर शेख, अर्जुन गोसावी यांनी तातडीने हालचाली सुरू करत संशयितांनी पळालेल्या मार्गाचा शोध घेतला. करमाळा शहरात आलेल्या चोरांचा पाठलाग करीत पुढे असलेल्या गावातील पोलीस पाटील यांना कळवले यावेळी त्यांनी कोर्टी व गोरेवाडी येथील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील यांनी गावातील युवकांना सतर्क केले.
युवकांनी कोर्टी ते कर्जत तालुक्यातील आळसुंदे येणाऱ्या रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने पाळत ठेवली. काही वेळात चार संशयित वेगाने दुचाकीवर येताना दिसले. त्यांना थांबण्याचा इशारा करूनही ते न थांबल्याने युवकांनी त्यांचा पाठलाग केला. पुढे इतर युवकांच्या मदतीने संशयितांना घेराव घालून ताब्यात घेण्यात आले.

संशयित पकडल्याची माहिती तात्काळ करमाळा पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलीस मागावर होतेच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौघांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत. यावेळी कोर्टी व गोरेवाडी येथील तरुणांच्या धडासाचे कौतुक होत आहे.


