करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

गावातील दफनभुमीचा वाद तेरा किमी लांब शहरात आणुन झाला दफनविधी

करमाळा समाचार – विशाल घोलप (९४०४६९२४४०)

करमाळा तालुक्यातील विहाळ येथे मुस्लिम समाजासाठी दफन भूमी नसल्यामुळे दुसऱ्यांदा दोन समाजात तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तात्पुरता त्यावर तोडगा काढत संबंधित मुस्लिम परिवाराने तब्बल १३ किलोमीटर लांब करमाळा शहरात येऊन येथील दफनभूमी मध्ये अंत्यसंस्कार केले. त्यामुळे तात्पुरता वाद मिटला असला तरी गावात मुस्लिम व हिंदू दोन्हीही स्मशानभूमी नसल्यामुळे नेहमी वाद होताना दिसत आहेत.

विहाळ येथे हिंदू व मुस्लिम (hindu – maratha) धर्मियांसाठी स्मशानभूमी व दफनभूमी नसल्यामुळे बरेच जण आपापल्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करतात. तर मुस्लिम धर्मीय एका ठराविक जागेवर दफन करत होते. परंतु मागील काही काळापासून त्या जागेचा वाद सुरू असल्याने त्या ठिकाणी दफन करण्यासाठी परवानगी दिली जात नाही.

सदरची जमीन ही खाजगी असल्याचे सांगितले जात आहे. हा वाद मागील वेळीही उफाळून आला होता. त्यावेळी मात्र प्रशासनाने आश्वासन देऊन वेळ मारून नेली होती. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री विहाळ गावातील गणी फकीर मोहम्मद शेख यांचं हृदयविकाराने निधन झाले.

त्यांना पुन्हा त्याच जागेत दफन करण्याचे नियोजन सुरू असताना ज्यांची जागा आहे त्यांनी त्या ठिकाणी हरकत घेतली. व हा वाद दुपारी तीन वाजेपर्यंत असाच सुरू राहिला. अखेर प्रशासनाने पुन्हा एकदा सर्वे करून नवी जागा शोधू व मुस्लिम समाजाला दफन विधीसाठी देऊ असे आश्वासन दिले. पण तरीही मुस्लिम समाज त्याच ठिकाणी दफन करण्यासाठी आग्रही होता.

अखेर जास्त काळ मृतदेह राहिल्यामुळे शेख परिवाराने सदरचे अंतिम संस्कार हे करमाळा येथील दफनभूमीत करण्याचे ठरवले व त्या पद्धतीने संपूर्ण विधी उरकला व विहाळ येथील जागेच्या वादावर पडदा पडला. पण प्रशासन आणखी किती दिवस याकडे या विषयाकडे दुर्लक्ष करणार हा मोठा प्रश्न आहे. गावात एकही स्मशानभूमी नसणे दुर्दैवी बाब आहे.

दुसरी बाजु …
मागील काही वर्षांपासून मुस्लिम समाजाच्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन आमच्या कुटुंबाने सहकार्याची भावना म्हणून दोन गुंठे जागेत दफन करण्याची परवानगी दिली होती. परंतु त्यांच्यातील काही मंडळींनी त्या भागातील वीस गुंठे आम्हाला दफनभूमीसाठी द्यावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली. त्यामुळे सदरची जागा खाजगी असल्यामुळे आणि सहकार्याच्या भूमिकेतून देत होतो त्या जागेवर दावा करायला लागल्यामुळे आम्ही त्यांना दफणभूमी साठी दुसरीकडे किंवा प्रशासनाकडे जागा मागावी असे सांगितले व दफन झालेली जागा सोडून वाढीव जागा देण्यास नकार दिला. तेव्हापासून हा वाद सुरू आहे. विशेष म्हणजे सरपंच होण्यापूर्वी पासून आपण त्याला आपण विरोध करत आहोत आणि आजही आपला विरोध राहणार आहे. तर सरकारी जागेसाठीही आपण प्रयत्न करीत आहोत.
– मोहन मारकड, सरपंच विहाळ. (Vihal)

अधिकारी म्हणाले …
गावात दानशूर व्यक्ती कोण जागा देत आहे का याची चाचपणी सुरू आहे. शिवाय गावातील शासकीय जमिनी बाबत कोर्टात वाद सुरू असल्यामुळे सदरच्या जागेवर दफनभूमी करता येत नाही. त्यामुळे कागदपत्रांची तपासणी करून पुढील निर्णय घेतला जाईल.
– मनोज राऊत, गटविकास अधिकारी, करमाळा.(karmala)

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE