नेत्यांचीच भुमिका डामडौल ; राष्ट्रवादीच्या तुतारीची ‘पिपाणी’ कडे वाटचाल
करमाळा समाचार

सध्याच्या परिस्थितीत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपा व मित्र पक्षांनी जरी बाजी मारली असली तरी सामान्य माणसांमध्ये अजूनही सत्ताधाऱ्यांविरोधात रोष आहे. त्यामुळे पर्याय म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुतारीकडे पाहिले जातं. पण राष्ट्रवादीच डामडोल असल्याने लोकांचाही भ्रमनिरास होत आहे. शिवाय राज्य पातळीवर त्यांची भूमिका संशयास्पद असल्याने लोकही आता विचार करू लागले आहेत. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली. तर राष्ट्रवादीच्या तुतारीची ‘ पिपाणी’ झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधकही तुतारीला पिपाणी म्हणुन हिनवत होते आज तीच वेळ येण्याची शक्यता वाढलीय.

करमाळा तालुक्यात नुकत्याच नगरपरिषद पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुका पार पडल्या. विशेष म्हणजे नगरपालिका निवडणुकांमध्ये तर राष्ट्रवादीला उमेदवारीच नव्हती किंवा त्यांनी आपले उमेदवार या ठिकाणी उभा करणे टाळलं. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार व खासदार वेगवेगळे लढल्याने तुतारी खासदारांच्या वाटेला गेली. तर आमदारांनी अपक्ष लढवणे पसंत केले. त्यामुळे त्यांच्या फुटीमुळे तुतारीची वाताहत होताना दिसून आली.
सामान्य लोकांना आजही भाजपा शिंदे गट शिवसेना व राष्ट्रवादी (घड्याळ) यांना पर्याय म्हणून तुतारी हा पर्याय पसंत पडलेला असतानाही सक्षमपणे उभा न राहिल्याने या ठिकाणी वाताहात होताना दिसून येत आहे. तालुका पातळीवर अडचणी व निधीचे कारण करून राष्ट्रवादीचा एक गट सत्ताधारी असलेल्या भाजपा व शिंदे गटाशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी राष्ट्रवादी (तुतारी) च्या अडचणीत वाढ होताना दिसणार आहे. अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी (तुतारी) कितीही ताकतीने लढली तरी त्यांना अपेक्षित यश या ठिकाणी मिळेल अशी शास्वती दिसून येत नाही.

स्व. अजित दादा यांनी राष्ट्रवादीतून फारकत घेऊन सत्ताधारी गटाशी हात मिळवली केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांच्याकडून सक्षम विरोधी गटाची अपेक्षा असताना राज्यात मात्र त्यांच्याकडून अपेक्षित असा विरोध होताना दिसत नाही. याशिवाय कधी ते सत्ताधारी यांच्यासोबत जाऊन मिळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही आता लोक संशय घेऊ लागले आहेत. तर तालुका पातळीचा विचार करता आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असलेलेच समर्थक हेच सत्ताधारी गटाकडून निवडणूक लढवून विजयी होत आहेत. मग कार्यकर्त्यांनी वेगळा निर्णय घेऊन सत्ताधाऱ्यांसोबत गेलेलेच काय वाईट आहे.

