करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आमसभा घ्या – भोसले

करमाळा समाचार -संजय साखरे

आमसभा हे जनतेच्या समस्या सोडवण्याचे विचारपीठ असते . करमाळा तालुक्यात सन 2015 पासून पंचायत समितीने आमसभा घेतली नाही. आम सभा न घेतल्यामुळे जनतेच्या हक्कावर गदा येत असून त्यामुळे तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून करमाळा पंचायत समितीची आमसभा तात्काळ घ्या अशी मागणी नेरलेचे माजी सरपंच औदुंबर राजे भोसले यांनी लेखी निवेदनाद्वारे करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

करमाळा तहसील कार्यालयामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांची अनेक कामे पेंडिंग असून दोन दोन वर्ष त्यांना त्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. अवकाळी पावसाचे अनुदान अद्याप पर्यंत जमा झालेले नसून अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप उऊसाची बिलेच दिली नाहीत. यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. करमाळा शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्यांची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे.

तहसील कचेरी व पोलीस स्टेशनची इमारत पावसाळ्यात गळत असून करमाळा शहरातील ऐतिहासिक किल्ला त्याचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. उजनी ते सीना कोळेगाव प्रकल्प बोगदा याचे काम 2022 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असताना ते अद्याप झाले नाही. सीना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी आवाटी, नेरले, आळसुंदे, सालसे, हिवरे, हिसरे, कोळगाव, गौडरे या गावांना कॅनल द्वारे दिले पाहिजे.

याशिवाय सोसायटी निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदणी झाले आहेत. यासह तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी व विकास कामे मार्गी लावण्यासाठी करमाळा पंचायत समितीने तात्काळ आमसभा बोलवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावर पंचायत समितीचे सभापती अतुल भाऊ पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष सतीश राव निळ, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे, संचालक नामदेव भोगे ,शहाजी ठोसर, पत्रकार सुनील भोसले, शंभूराजे फरतडे, अण्णासाहेब सुपणवर, वरकुटे चे सरपंच दादासाहेब भांडवलकर, राजाभाऊ कदम, प्रहार चे संदीप तळेकर, आबासाहेब टापरे या तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE