करमाळा पोलिसांची मोठी कारवाई ; 10 किलो गांजासह कार जप्त
करमाळा समाचार :

करमाळा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत २ लाख ५२ हजार ५०० रुपये किमतीचा १० किलो १०० ग्रॅम गांजा आणि ८ लाख रुपये किमतीची सिल्व्हर रंगाची पजेरो स्पोर्ट कार जप्त करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी रात्री पांगरे (ता. करमाळा) हद्दीतील टेंभुर्णी-जेजुरी रस्त्यावरील पांगरे स्मशानभूमीजवळ गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित रोहित शिवाजी केचे (वय २४, रा. गारअकोले, ता. माढा, जि. सोलापूर) हा पजेरो स्पोर्ट कारमधून गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.
झडतीदरम्यान कारमध्ये पाच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेला १० किलो १०० ग्रॅम गांजा आढळून आला. त्याची अंदाजे किंमत २,५२,५०० रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ८ लाख रुपये किमतीची पजेरो स्पोर्ट कार देखील जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण १०,५२,५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४४/२०२६ नोंद करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तसेच पोलीस कर्मचारी दुश्यंत ठोंबे, लोहार, अतिलमलिक शेख, अर्जुन गोरसावी, गणेश शिंदे, रमेश फुगे, चेतन पवार आणि ज्योतीराम बारकुंड यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.


