करमाळासोलापूर जिल्हा

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने निषेध

करमाळा समाचार -संजय साखरे


मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या विषयी केलेल्या विधानाचा संस्थेच्या वतीने निषेध करण्यात आलेला असून त्यांनी या विषयीचे एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गोरगरीब, डोंगरदर्‍यामध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 103 वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे ही कर्मवीरांची दूरदृष्टी होती. म्हणून त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. किर्लोस्कर, ओगले, कुपर या कंपनीमध्ये कर्मवीरांनी जे काम केले त्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न ,त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या माध्यमातून असलेले उत्पन्न, किर्लोस्कर कंपनीतील अण्णांचे शेअर्स ,आई-वडिलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम, पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांच्या माहेर कडून मिळालेले शंभर तोळे सोने, मंगळसूत्र सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले.

विद्यार्थ्यांनी भीक मागून शिकण्यापेक्षा स्वावलंबनाने स्वकष्टाने आपले शिक्षण पूर्ण करावे हे कर्मवीरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान होते. यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा व शिका’ ही योजना राबवली. आज या योजनेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. म्हणूनच “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे कर्मवीरांनी संस्थेचे ब्रीद घेतले.

कर्मवीरांच्या या कार्याला समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लोकसहभागातून ही शैक्षणिक चळवळ अधिक अधिक व्यापक केली. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी समाजाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. या माध्यमातून कोट्यावधी मुलांना शिक्षण मिळाले. आज महाराष्ट्र शैक्षणिक दृष्टी अग्रेसर दिसतो आहे त्याला अण्णांचे स्वावलंबी शिक्षणाचे हे तत्वज्ञान कारणीभूत आहे. असे म्हटले तर अनुचित ठरणार नाही .

राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज हे कर्मवीरांचे आदर्श होते .याच कालखंडात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा कर्मवीरांना मोठे सहकार्य लाभले म्हणून ज्ञानाने समृद्ध असलेली पिढी कर्मवीर निर्माण करू शकले. या सर्व पार्श्वभूमीवर नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचा संस्थेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE