करमाळासोलापूर जिल्हा

तीन जिल्ह्याच्या सीमेवरील तालुक्याचा दोन कारणांमुळे विकास खुंटला

करमाळा –


तालुका तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असताना ही अपेक्षित असा विकास या ठिकाणी होताना दिसून येत नाही. भौगोलिक परिस्थिती व रखडलेला एमआयडीसी प्रकल्प या दोन कारणांमुळे येथील विकास खुंटल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या सीमा विस्तारलेल्या असल्याने तालुक्यातील प्रमुख गावांपासुन शहराचे अधिक अंतर आणी व्यापार व व्यावसायिक संधी कमी असल्याने लोकांचा ओढा शहराकडे कमी प्रमाणात आहे. त्यामुळे एम आय डी सी प्रकल्प मार्गी लागल्यास तालुक्याच्या विकासात भर पडेल.

अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला करमाळा तालुक्यात उजनी व कोळगाव धरणाचे पाणी लाभले आहे. पण उजनी धरणात कायम पाणी उपलब्ध असले तरी कोळगाव धरणाचे पाणी कायम असेल असे नाही. तसेच उजनी पट्ट्यातील गावे हे करमाळा शहरापासुन तीस किमी पेक्षा जास्त अंतरावर आहेत. तर त्या गावांना टेंभुर्णी, भिगवण, इंदापूर या बाजारपेठ जवळ आहेत. त्यामुळे उजनी पट्ट्यातील मोठ्याप्रमाणावर उलाढाल तिकडेच होते. करमाळ्याकडे फिरकावे अशी प्रगती सध्या तरी नाही. मोठे उद्योग उभे राहिल्यास करमाळ्याकडे आवक जावक वाढेल त्यामुळे एमआयडीसी प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे आहे.

शहराच्या जवळच सहकारी तत्वावर चालणारी अद्योगीक वसाहत आहे. तिथे वीजेची व पाण्याची सोय आहे. एकुण चाळीस एकर क्षेत्रावर ९२ प्लॉट आहेत. तर ६१ लघु उद्योग त्या ठिकाणी कार्यान्वित आहेत. याउद्योगात सिमेंट ब्लॉक, फॅब्रिकेशन, पुष्टा, प्लॅस्टीक प्रक्रिया, ऑईल मील यासारखे छोटे मोठे उद्योग कार्यान्वित आहेत. पण आता प्लॉट शिल्लक नसल्याने नवीन उद्योग येऊ शकत नाहीत. नवीन उद्योगांसाठी मोठी जागा नव्या एम आय डी सी प्रकल्पात उपलब्ध आहे. पण तिथे पाण्याचा तुटवडा आहे.

एम आय डी सी उभारणीत मुख्य अडचण पाणी …
पाण्याअभावी मागील दहा वर्षापासुन एम आय डी सी प्रकल्प रखडलेला आहे. मुळात मांगी तलावावर वीस ते पंचवीस गावांची पाण्याचे नियोजन अवलंबून आहे. पण मांगी तलावात पाणी आणण्यासाठी कुकडी किंवा पावसाच्या पाण्यावर अवलंबुन रहावे लागते. त्यामुळे पाऊसाने हुलकावणी दिल्यास तलावातच पिण्यासाठी पाणी नसते मग तेव्हा उद्योगांना पाणी कसे उपलब्ध होणार हा ही प्रश्न आहे. सध्यातरी मांगी पर्यत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आणण्याचे नियोजन आहे. पुढे तेच पाणी एम आय डीसी साठी नेले जाईल. पण बाकी वीज, रस्ते, जागा सर्व उपलब्ध असताना पाणी नसल्याने सदर प्रकल्प रखडला आहे.

सदर प्रकल्पाचा फायदा …
शहरापासुन दोन किमींच्या अंतरावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तब्बल १२५ एकर जागा आरक्षीत करण्यात आली आहे. त्यामध्ये ५९ भुखंड उपलब्ध केले गेले आहेत. पथदिवे व रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे. तसेच त्याच जागेत महावितरण महामंडळाला ३३ केव्ही विद्युत पुरवठा केंद्र उभारणी केली आहे. तर एका चौरस मीटर साठी ६०० रुपये भाव काढलेला आहे. याठिकाणी पाणी उपलब्ध झाल्यास मोठे उद्योग आल्यानंतर तालुक्याच्या उलाढालीत कमालीची वाढ होईल. आस पासच्या तालुक्यात जाणारा माल करमाळ्याकडे येईल शिवाय तालुक्यात हजारो युवकांना काम उपलब्ध होईल. त्यामुळे पुणे मुंबई कडे जाण्याची गरज पडणार नाही. सध्या रस्त्याचे काम सुरु आहे पाणी उपलब्ध करण्याचे प्रयत्न आहेत. लवकरच याची ऑनलाईन नोंदणी सुरु होईल अशी माहीती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE