E-Paperसोलापूर शहर

माणसातला देव जेव्हा आपल्याला गंडवतो ; तुमच्या फसवणुकीला तुम्हीच जबाबदार – प्रशासनाची भुमीका ?

करमाळा समाचार 

नुकतेच उंदरगाव येथील मनोहर मामा (manohar mama) यांचे प्रकरण प्रकाशझोतात आले व एक ना अनेक प्रश्न पुन्हा एकदा आ वासून पुढे समोर उभा राहिले. समाजात वावरताना प्रत्येकालाच काही ना काही अडचणी असतात त्या अडचणींना मार्गदर्शन कोणीतरी असावी असे प्रत्येकाला वाटते ते कमीत कमी त्या अडचणी समजून घेणारा जरी कोणी असेल तर त्यावर कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवायला सुरु करतो. त्यात सामान्य माणूस तर आहेच शिवाय मोठमोठे उद्योगपती व नेतेमंडळी यांचाही समावेश आहे. हे सर्व असताना अधिकारी कुठे मागे राहतील त्यांनाही समस्या आहेतच. त्यातून मार्ग काढण्यासाठी खोट्या आशां वर जिवंत ठेवण्यासाठी एक बाबा मिळतो आणि तो आपल्याला पुढे तुझं चांगले करून देतो असे म्हणून आपला विश्वास संपादन करतो. हे करत असताना त्याची आपल्याशी एवढी जवळीक ही नसते आणि त्याला आपलं घेणेदेणे नाही नसतं त्याचा डोळा फक्त तुमच्या खिशावर असतो. त्याला तुमचा खिसा मोकळा करून समाधान मिळत.

गल्लीत एखादा साधु महाराज किंवा फकीर आला आणि त्याने सहज बोलता बोलता म्हणाला की तुमचा हा लहान मुलगा नक्कीच किर्तीवान होणार आहे. मोठा झाल्यावर डॉक्टर किंवा इंजिनिअर होईल तो तुम्हाला सांभाळेल असे आशादायक वाक्य ऐकून प्रत्येकच महिला तसेच कुटुंबियांना त्या महाराजाचं खरं होऊ अशी अपेक्षा वाटू लागते. त्यातून तो भावनिक होऊन त्या महाराजा कडे किंवा त्या फकीरा कडे अंधविश्वास ठेवून त्याने सांगेल त्या पद्धतीने वागू लागतो. त्यातच काहीजण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांकडे भीक मागण्या ऐवजी समाधान करून काही पैसे गोळा करण्याचे काम करतात. पण त्यातही काही चतुर, चालाख, हुशार असे काही भामटे समोर येतात. व ते स्वतःच्या पोटाच्या खळगी पेक्षा तुमची दिशाभूल करून तुमच्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्याला पैसे देणारे हे विसरून जातात की जर याच्याकडे खरंच एवढी ताकत असली असती की येणाऱ्या काळात काय घडणार आहे हा सांगत असेल तर हा आपल्या दारावर काही मागण्यासाठी आला असता का ? हा प्रश्न एकालाही पडत नसावा हे आपले दुर्दैव आहे.

करमाळा तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या भारत देशात अशा प्रकारचे भामटे सर्वत्र फिरत असतात. पण प्रशासन असेल किंवा याबाबत कल्पना असणारे कधीच आपले तोंड उघडत नाही किंवा कायद्याने ही अनेक पळवाटा काढून ठेवल्याने ही लोक राजरोसपणे आपल्याला लुटत आहेत. तरी हे गुन्हेगार कुटुंबाचा त्याग करुन समाजासाठी झटणारे साधु नसुन भामटे साधू, देव, भक्त, वारस , अवतार अशा नावाने आपल्यात कायम वावरत असतात. पण त्यांची पार्श्वभूमी न पाहता त्यांच्यावर विश्वास ठेवतो. हे झाले सामान्य व्यक्तींची पण जी यंत्रणा आपल्यासाठी काम करते. ही यंत्रणा यांच्यावर का लक्ष ठेवू शकत नाही. सामान्य गुन्हा भांडण वाद झाले तरी कोणालाही सूट का मिळत नाही. तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर लुट होत असताना त्याच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का असते. याची शहानिशा न करता संबंधिताला इतरांना लुटण्याचे संधी का देत असतील हा प्रश्न सामान्य लोकांना पडल्याशिवाय राहत नाही. कोणीतरी येऊन त्याची तक्रार करावी याची वाट हे प्रशासन का बघत असेल.

ज्यांनी तक्रारी केल्या त्याचे पुढे काय होईल. ज्यांनी तक्रारी केल्या नाहीत ते का पुढे आले नाहीत असे अनेक प्रश्न आहेत साधारण त्या बाबतीत जर कोणी तक्रार केली तर तक्रारदाराला अधिक त्रास न देता पुढील विषयांवर चौकशी करुन शहानिशा करण्याचे काम संबंधित विभागाने करणे अपेक्षित आहे. परंतु तक्रारदाराला जर वारंवार हेलपाटे घालून त्रास दिला जात असेल किंवा तक्रार दाखल केल्यानंतर जर कोणी दखल घेणार नसतील तर तक्रार करण्यासाठी पुढे कोण येणार आहे. मंत्री, संत्री, अधिकारी यांचा लवाजमा आपले डोके टेकतो अशा ठिकाणी साधारण अधिकाऱ्यांकडून कारवाईची अपेक्षा करणे हा मूर्खपणा ही असू शकतो. पण ज्या पद्धतीने संबंधित माणसाने लोकांची उघड्या डोळ्याने फसवणूक केली. त्याला न थांबवल्याने आपणही लोकांची फसवणूक करत नाहीत का असा प्रश्न त्यांना का पडत नसावा ्यांच्यावर अन्याय होतोय किंवा झाला आहे असे त्यांनी दाद मागू नये का असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने आज पडत आहे.

सध्या असेच एक प्रकरण उंदरगाव येथे सुरु आहे. महाराज खरे किंवा खोटे पुढचा विषय पण त्यांच्या बाबतीत ऐकण्यात आलेल्या तक्रारी खऱ्या किंवा खोट्या याचा शोध प्रशासनाने पोलिसांनी घेणे गरजेचे आहे. महाराज स्वतः म्हटल्याप्रमाणे जर फक्त मार्गदर्शन करत असतील तर त्यांना ही न्याय मिळायला हवा. पण जर खरच एखाद्या गरीबाची फसवणूक होत असेल तर त्याला न्याय कोण देणार ? या निमित्ताने एक गोष्ट आवर्जून प्रकाशात येते जर तुम्ही मंदिर ट्रस्ट यांच्या नावाने तुम्ही नोंदणी केली तर त्याचा हिशोब देण्याची गरज पडत नसावी का ? जर असंच होत राहिल तर अनेक काळे धन वाले लोक अशाच पद्धतीने मंदिर व ट्रस्टची उभारणी करून आपला काळा पैसा गोरा केलेला ही कळून येणार नाही. आणि सामान्य माणूस कायम पोटाची खळगी भरण्यासाठी जमवलेले पैसे शासनाच्या घशात घालत राहील. हजारो कोट्यावधी रुपये उलाढाल होऊन ही जर तिथे कराचा संबंधित नसेल तर सामान्य लोकांनीही अशीच कुठेतरी संस्था उभा करून लोकांकडून पैसे काढू नयेत असे प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं आपल्याला कधीच मिळणार नाहीत. जोपर्यंत आपण याच्या मुळाशी जात नाही.

सध्या सुरू असलेल्या वादावर कोणताच न्यायालय, कायदा किंवा अधिकारी व प्रशासन याकडे तुम्हाला न्याय देऊ शकेल की नाही माहीत नाही. पण अशा लोकांकडे जे देव स्वतःला देव समजतात अशा लोकांकडे न जाता आपली फसवणूक होण्यापासून वाचवल्यास अशा लोकांचं फावणार नाही. जर तुम्ही स्वतः आमिषाला बळी पडत असाल तर तुमच्या फसवणूकीला तुम्हीच जबाबदार असाल. त्यावेळी दुसऱ्यांकडे मदतीची अपेक्षा करून तरी काय उपयोग. त्यामुळे सज्ज व्हा, शहाणे व्हा व पैशाचे व्यवहार करताना कोणाकडे व कशासाठी आपली रक्कम सोपवतोय याचे भान ठेवून व्यवहार करा. कोणतेही आजार औषध व व्यायमाशिवाय जप, तप, पुजा पाठ करुन बरे होत नसतात. हे आता अडाण्यांना समजु लागले पण हुशार लोकांना कधी समजणार ?

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE