करमाळासोलापूर जिल्हा

दारु सोडवा, पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा उपक्रम करमाळ्यात सोळा पालकांची दारुमुक्तीची शपथ

समाचार टीम

करमाळा – दारु सोडवा, पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा असा उपक्रम यशकल्याणी सेवाभावी संस्था, ग्रामसुधार समिती, जीवन शिक्षण परिवार आणि पंचायत समिती करमाळा यांच्या वतीने घोषित करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनापासून सदर उपक्रमात सहभाग होण्याचे आवाहन करण्यात आले असताना स्वातंत्र्य दिनी तालुक्यातील सोळा पालकांनी दारु सोडण्याची शपथ घेत या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.

येथील गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून दारु मुक्तीसाठी हा अभिनव उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. या उपक्रमास विविध संस्थांकडूनही प्रतिसाद मिळाला. दरम्यान यामध्ये सहभाग नोंदविणाऱ्या संबंधितांना या पंधरा अॉगस्ट पासून पुढील वर्षभर दारु पासून दूर राहताना दारु सोडावी लागणार आहे. त्यानंतर निरीक्षण होवून संबंधिताच्या पाल्यास शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

दारुमुळे होणारे नुकसान थोपविण्यासाठी घोषित सदर उपक्रमाची अंमलबजावणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनापासून होत असताना तालुक्यातील सोळा जणांनी दारु सोडण्याची शपथ जाहीरपणे घेतली आहे. त्यामध्ये गौंडरे पाच, फिसरे तीन, भगतवाडी – गुलमोहोरवाडी आणि कविटगाव प्रत्येकी दोन, पाथुर्डी, भोसे, सरपडोह आणि खडकी प्रत्येकी एक अशा सोळा जणांचा सहभाग आहे.

गटविकास अधिकारी मनोज राऊत, ॲड. बाबूराव हिरडे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे – पाटील आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तर आणखी कोणाला या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी सहभाग नोंदविण्यासाठी गाव पातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांंशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE