करमाळासोलापूर जिल्हा

आमचा खांदा अजुन किती दिवस ; नेत्यांच्या भांडणात कार्यकर्त्यांचे हाल

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्याच्या राजकारणात वेगळ्याच प्रथा आणि परंपरा पडू लागल्या आहेत. एकाच विषयावर किंवा केलेल्या व न केलेल्या कामांचा गवगवा करीत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पण असे करत असताना प्रमुख नेते मंडळी शांत बसलेले दिसतात. पण दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांच्या नावे बातम्या दिल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रमुख विकासाचे मुद्दे बाजूला राहून तालुक्यात लहान पोरांसारखे राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. तर तुम्ही आमच्या विकासाबाबत काय करणार असा प्रश्न जनता विचारू लागले आहे. सत्ताधारीसह विरोधकांनाही हाच प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

वैयक्तिक आयुष्याचा व राजकारणाचा काही एक संबंध नसताना नेत्यांना खूश करण्यासाठी कार्यकर्ते विविध युक्त्या लढवत असतात. परंतु आजकाल असे कार्यकर्तेही मिळणे कठीण झाले आहे. नेत्यांसाठी पुढे येऊन वाद घालणे व वाद काढणे असे कार्यकर्ते मिळून येत नाहीत म्हणून आता प्रमुख नेत्यांना संबंधित कार्यकर्त्याच्या परस्परच पुढील नेत्यावर शाब्दिक तोफ डागली जात आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचा खांदा वापरला जात आहे असे करत असताना नेता संबंधित कार्यकर्त्याला समोर करताना दिसत आहे. पण यातून त्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत पुढील गटाचा नेता राग मनात धरू शकतो व त्यातून वेगळे काही तरी विपरीत घडू शकते.

जर आपले खरे असेल व कोणाला भिण्याची गरज नसेल तर प्रत्येकाने समोर येऊन बोलणे गरजेचे आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारणे कितपत योग्य आहे. इतर तालुक्याप्रमाणे करमाळ्यातील राजकीय नेत्यांमध्ये एवढे धाडस राहिले नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. स्पर्धक नेत्या विरोधात कार्यकर्त्यांना तोंडून बोलण्यापेक्षा स्वतः पुढे येउन खुलासे व विरोध केल्यास कार्यकर्त्यांवर ही दडपण येणार नाही शिवाय वाद-विवाद ही होणार नाही.

वैयक्तिक व खाजगी आयुष्यात कोण कोणते उद्योग करतो किंवा कोणाच्या मागे कोणते लफडे आहेत हे सध्या करमाळ्याच्या राजकारणात उघडकीस आणण्यास दुसऱ्या तिसऱ्या फळीच्या माध्यमातुन नेत्यांना रस राहिलेला दिसून येत आहे. पण तालुक्यातील आजही अनेक ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था आहे, पिण्याचे पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचा प्रश्न आहे अशा विविध प्रश्नांवर बोलण्यापेक्षा एकमेकांची उणीदुणी करण्यात या नेत्यांना रस राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेत्यांनीही आता स्वतः समोर येऊन धाडसाने विरोध करायला हवे. त्याशिवाय आमचा खांदा अजुन किती दिवस तुम्ही वापरणार असाही प्रश्न त्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे पण हात दगडाखाली अडकल्याने ते काही बोलू शकत नसल्याचे दिसून येत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE