E-Paper

सुखद बातमी – लॉकडाऊनच्या कचाट्यात सापडलेला महाराष्ट्र लवकरच मुक्त होण्याची शक्यता

करमाळा समाचार 

राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर कधीही उठवला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोकण दौर्‍यात सांगितल्याने कोरोनाच्या कोंडवाड्यात बंद पडलेल्या महाराष्ट्राच्या आशा पल्‍लवित झाल्या आहेत.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अवघ्या दीड महिन्यात तिसर्‍या लॉकडाऊनमधून महाराष्ट्र जात आहे. सलग लादले जाणारे लॉकडाऊन कधी थांबतील आणि बाजारपेठ पूर्ववत केव्हा सुरू होईल याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला आहे. गेल्या 15 मेपासून जाहीर केलेला दुसर्‍या लाटेतील तिसरा लॉकडाऊन 31 मे रोजी संपेल. काटेकोर सांगायचे तर 1 जून रोजी सकाळी 8 वाजता हा लॉकडाऊन उठवला जाणे अपेक्षित आहे.

रुग्णसंख्येवर निर्णय अवलंबून

लॉकडाऊन उठवण्यासाठी कोरोनाची रुग्णसंख्या हीच पूर्वअट असल्याने कोरोनाचा ग्राफ किती खाली येतो यावर लॉकडाऊन कमी अधिक तीव्र ठेवणे अवलंबून असेल. मंत्रालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी नोंदवली गेली अशी शहरे लॉकडाऊनमुक्‍त होऊ शकतात. ज्या शहरांमध्ये अजूनही कोरोनाचा जोर कायम आहे तिथे मात्र एक तर आहे तो लॉकडाऊन कायम राहील किंवा गर्दी रोखणारे निर्बंध लागू करून बाजारपेठा मर्यादित स्वरूपात खुल्या केल्या जाऊ शकतात.

अंशत: लॉकडाऊन सुरू राहील?

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात अत्यंत सूचक वक्‍तव्य केले. तिसरा लॉकडाऊन केल्यानंतर राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णवाढ कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवताना याचाही विचार करावा लागेल, असे थोरात म्हणाले. याचा अर्थ 1 जूननंतर सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही. अंशतः लॉकडाऊन कायम राहू शकतो. अर्थात या अंशतः लॉकडाऊनमध्ये बाजारपेठा सुरू करा, दुकाने उघडू द्या, हॉटेल्स पुन्हा चालू करा या महत्वाच्या मागण्यांचा विचार होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

– वृत्तसंस्था

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE