राजकीय वार्तापत्र – वातावरण फिरले… करमाळ्याच्या राजकारणात पवारांची पुन्हा एकदा मुसंडी
करमाळा समाचार
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातच राष्ट्रवादीची पडझड मोठ्या प्रमाणावर झाली होती. जिल्ह्यातील मातब्बर नेते विरोधात गेल्यानंतर राष्ट्रवादी बरीचशी पिछाडीवर आल्याचे दिसून येत होते. या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील कोणताही उमेदवार निवडून येईल तो राष्ट्रवादी विरोधी व बीजेपी समर्थक असल्याचे दिसून येत होते. पण आता परिस्थिती बदलली. त्यामुळे वातावरण ही फिरण्याची दिसून येत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत करमाळा तालुक्यातील तीन मातब्बर नेते मैदानात उतरले होते. त्यामध्ये विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील व त्यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांचा समावेश होता. यावेळी भाजपाकडून आखलेल्या रणनीतीमध्ये विरोधी पक्ष पुरता अडकलेला दिसून आला. करमाळा तालुक्यातील युतीच्या उमेदवार वगळता दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी देता आली नव्हती. यावेळी राष्ट्रवादीने अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला होता.

2019 च्या निवडणुकांमध्ये भाजपा शिवसेना युती प्रबळ दावेदार मानली जात होती. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याचा ओढा ही वाढला होता. याचा फटका करमाळा तालुक्यातही बसला. राष्ट्रवादीचे उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे बागल कुटुंबीय यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीला रामराम करीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीची अपेक्षा संजय मामा शिंदे यांच्यावर येऊन थांबली. पण त्यांनीही त्याला नकार देत अपक्ष निवडणूक लढवली. यावेळी राष्ट्रवादीला त्यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय दिसून आला नव्हता.
तर तत्कालीन आमदार असतानाही शिवसेनेकडून डावल्यामुळे नारायण पाटील हे अपक्ष रिंगणात उतरले होते. यावेळी मोहिते पाटील जरी बीजेपीत असले तरी त्यांच्या गटाकडून पाटील यांना छुपा पाठिंबा होता. त्यामुळे पाटील निवडून आल्यानंतर मोहितेंच्या माध्यमातून बीजेपीच्या गोठ्यात जातील अशी शक्यता होती. तर रश्मी बागल या युतीकडूनच उभा राहिल्या असल्याने त्या निवडून आल्यानंतर बीजेपी शिवसेनेच्या आमदार म्हणवल्या गेल्या असत्या. याशिवाय संजय मामा शिंदे यांनीही निवडणूक जिंकल्यानंतर आपल्यासाठी सर्वदारे खुली ठेवली होती. त्याचा प्रत्यय निवडणुका नंतर मामांनी भाजपाला दिलेल्या पाठिंबावरून आला होता.
त्यामुळे त्यावेळेसची परिस्थिती सर्वकाही बोलून जाणारी होती. कोणताही उमेदवार निवडून आला तरी तो उमेदवार युती सरकारमध्ये सामील होईल असे दिसून येत होते. विरोधी गटात असलेल्या काँग्रेस – राष्ट्रवादी या ठिकाणी एकही उमेदवार उभा करता आला नव्हता. पण आता परिस्थिती बदललेली दिसून येत आहे. त्यामुळे वातावरण ही फिरले आहे. सध्या महाविकास आघाडीचा उमेदवार जवळपास निश्चित झाला असताना महायुतीकडून अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नाही. विद्यमान आमदार यंदाही अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. तर गेल्यावेळी सारखे राष्ट्रवादी अजित दादा गट यंदाही संजय मामा यांना पाठिंबा दिल्यास महायुती कोणती भूमिका घेते यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे.
याशिवाय प्रा. रामदास झोळ हेही मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे यांचाही ओढा हा राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडे असल्याचा दिसून येतो. त्यामुळे प्रत्येकच उमेदवार जवळपास राष्ट्रवादीशी जवळीक साधून आहे. ती राष्ट्रवादी अजितदादांची असो की मोठ्या साहेबांची. सध्या तरी दिवस फिरलेले दिसून आले आहेत. मागील वेळची परिस्थिती आणि यंदाची परिस्थिती पाहता वातावरण बदलले आहे. याचा फायदा नक्कीच राष्ट्रवादीला होताना दिसून येत आहे, अशा वेळी बीजेपी व शिवसेना (शिंदे गट ) काय भुमिका घेते याकडे लक्ष राहिल.