करमाळासोलापूर जिल्हा

दोन महिला अधिकाऱ्यांच्या बदली नंतर कृतज्ञता तर गुणवंतांचा गौरव सोहळ्याचे आयोजन

करमाळा समाचार

करमाळा येथे यशकल्याणी परिवाराकडून नागरी कृतज्ञता गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. करमाळा नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी वीणा पवार व करमाळा वनपरिक्षेत्राच्या वनअधिकारी मा.शितल नगराळेयांची बदली झाल्यामुळे नागरी कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला व यानिमित्ताने करमाळा तालुक्यातील गुणवंताचा गौरव करण्यात आला.

आयुष्यामधे यशाचे कौतुक करणा-यांना विसरू नका, सदैव प्रगतीची कास धरा, यशस्वी होईपर्यंत अफाट मेहनत करा, मनात जिद्द असेल तर या जगात अशक्यप्राय काहीच नाही , असे मत प्रा.प्रदिप मोहिते सरांनी व्यक्त केले ते
या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

कोरोना काळात अभूतपूर्व योगदान दिल्याबद्दल करमाळा नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वीणा पवार आणि डाॅ.कविता कांबळे यांना कोरोना योद्धा म्हणून गौरवपत्र देऊन सौ. मालती करे- पाटील व गयाताई करे-पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्राणिमात्रांची व वनसंवर्धनाची विशेष दखल घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण विषयाची आवड निर्माण केल्याबद्दल करमाळा वनपरिक्षेत्राच्या वनअधिकारी मा.शितल नगराळे यांना मानपत्र बहाल करण्यात आले.

ऑल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश पात्रता परीक्षेत कु. अनिल रेवणाथ जाधव, कु.अनिकेत दिपक मेनकुदळे,कु.सोहम राजेंद्र वनवे, कु.आदित्य आदिनाथ राऊत यांनी महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल या चारही विद्यार्थ्यांना प्रत्येकी रू तीन हजार रूपये व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच कु.योगेश बडेकर यास राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल आणि करमाळा तालुक्याचा बालगायक म्हणून कु.तेजस वैजिनाथ खाटमोडे पाटील या दोघांनाही मानपत्र व तीन हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

करमाळा पोलिस स्टेशनचे श्री.सचिनजी खुटाळ यांनी खात्यांतर्गत पोलीस उप निरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल व कु. स्वप्निल शिवाजी चव्हाण यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल ( CISF ) येथे देशसेवेसाठी निवड झाल्याबद्दल विशेष दखल म्हणून मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळेस करे-पाटील यांनी सर्व गुणवंताचे कौतुक केले.
करमाळ्यात करमाळकरांचे मिळालेले प्रेम, माया , आपुलकी, सहकार्य हे अभूतपूर्व होते ते परत कुठे मिळणे अशक्यच या शब्दात वीणा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शितलजी नगराळे यांनी करमाळ्यातील नागरिकांकडून झालेल्या सहकार्याबद्दल ॠण व्यक्त केले. कोविड काळात प्रशासन सजग राहिल्यामुळेच करमाळ्यात कोरोणाचा फार प्रसार झाला नाही,चांगले अधिकारी उत्तम समाज घडवतात असे डाॅ.कविता कांबळे यांनी प्रतिपादन केले. बालगायक तेजस खाटमोडे आणि दिपाली खाटमोडे यांनी आपल्या गोड आवाजात कविता गाऊन उपस्थितांची मने जिंकली.

यावेळेस सचिन खुटाळ,राजेंद्र वणवे,दिपाली खाटमोडे यांची भाषणे झाली.या कार्यक्रमास तात्याराव करे-पाटील, प्राचार्य नवनाथ मोहोळकर, कवी ओडीशियस, तात्यासाहेब ढाणे, मुख्याध्यापक चंद्रहास शिंदे, व्यसनमुक्त संघटनेचे अध्यक्ष रामराजे वाघमोडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कल्याणराव साळुंखे यांनी केले. सुत्रसंचालन सचिन नवले यांनी केले तर आभार मुख्याध्यापक विक्रम राऊत यांनी मानले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE