करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

लग्नमंडपात पाहुण्यांसारखी वावरत होती महिला ; नववधुचे दागिणे घेऊन पसार

करमाळा समाचार (karmala_crime) 


नवऱ्याकडील मंडळींनी नवरी मुलीला देण्यासाठी आणलेल्या दागिन्यांवर अनोळखी महिलेने हात साफ केला आहे. लग्न समारंभात जवळच्या पाहुण्यांप्रमाणे वावरत असलेल्या या महिलेने नातेवाईकाच्या पिशवीतून तीन तोळ्याची दागिने घेऊन पोबारा केला आहे. त्यानंतर या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात चोरी केल्याप्रकरणी दि २२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना १८ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान नालबंद मंगल कार्यालय करमाळा येथे घडली आहे.

याप्रकरणी करमाळा येथील गणेश दत्तात्रय गवळी रा. खडकपुरा ता. करमाळा यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, करमाळा येथील गणेश गवळी यांचे साडू रामचंद्र हारमोडे रा. कळम ता. इंदापूर जिल्हा पुणे यांचा मुलगा विशाल हारमुडे यांचा विवाह करमाळा येथील राजेंद्र घोरपडे यांची मुली सोबत १८ मार्च रोजी नालबंद मंगल कार्यालय येथे असल्याने हारमोडे यांनी नववधुस लग्नात घालण्यासाठी काही दागिने दिले होते.

त्यामध्ये कर्णफुले व मिनी गंठण व गंठण असे दागिने गवळी यांच्या पत्नी कडे ठेवले होते. त्यातील १७ मार्च रोजी सायंकाळी हळदी समारंभादिवशी कर्णफुले नववधुला देण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी १८ मार्चला २३.३९० ग्रॅम वजनाची सोन्याचे गंठण व १०.३३० ग्रॅम वजनाचे मिनी गंठण असे एकूण एक लाख ३५ हजार रुपयांचे दागिने हे लग्नादिवशी देण्यासाठी एका पिशवीत घेऊन गवळी कुटुंबीय हे नालबंद मंगल कार्यालय येथे आले होते. नवरदेव परण्यासाठी गेल्यामुळे गणेश गवळी यांच्यासह इतर कुटुंबीय हेही गेले होते. यावेळी सदरचे सोन्याचे दागिने हे गवळी यांनी आईकडे लग्न मंडपात एका पिशवीत ठेवण्यात आली होते. नवरा मुलगा परण्यासाठी गेलाय तोपर्यंत मुलीला ते दागिने देण्यासाठी गवळी यांच्या आईने तपासणी केली असता सदर पिशवीत दागिने मिळून आले नाहीत.

त्यावेळी हे दागिने कोणीतरी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावरून त्यांनी सर्वांना कळवले. त्यानंतर शोधाशोध केली असता एक अनोळखी महिला त्या परिसरात फिरत असल्याचेही बऱ्याच जणांच्या लक्षात आले होते. शिवाय मंगल कार्यालय पासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही मध्येही एक महिला घाई गडबडीत तेथून निघून जात असताना दिसत आहे. यावरून त्या महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

याबाबतची तक्रार करमाळा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एम. एन. जगदाळे हे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE